छोटीशी गोष्ट – बैलोबा का भितो?

>>सुरेश वांदिले

जाधवपूरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळय़ा झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरून त्या झाडावर उडय़ा मार, या फांदीला लटक, त्या फांदीला लटक, मध्येच आईला जाऊन बिलग, मध्येच जमिनीवर येऊन बागेतल्या नळाच्या तोटीवर जाऊन बस. ही मौजमस्ती सुरू असताना या बागेत एक बैलोबा कुठून तरी आला. तिथून तो जाऊ लागताच सर्व वानरं पटापट इकडे तिकडे पळाली. त्या वानरांना पळताना बघून तो बैलोबाही पळू लागला.

या सर्व घटनाक्रमाकडे एक पिल्लू वानर न घाबरता लक्ष ठेवून होतं. बैलोबा निघून गेल्यावर त्याने आपल्या आईबाबांना विचारलं, “बैलोबा दिसताच तुम्ही काका-काकू, मामा-मामी, आत्या, ताई, दादा, आजी-आजोबा का बरे पळालात?’’
“अरे, तो बैलोबा बघितलास ना, कसा आडदांड होता! त्याने त्याची शेपटी फिरवली तरी त्या तावडीत येणारे बेशुद्ध पडतील. तो किती शक्तिशाली, आपण त्याच्यापुढे अगदीच किरकोळ. अशा वेळी स्वसंरक्षणासाठी सावधगिरी म्हणून पळून जायचं असतं. नाहीतर ‘आ बैल मुझे मार’ असं शब्दशः खरे ठरायचे!’’ पिल्लू वानराच्या आईने त्याला सांगितलं.
पिल्लू वानर विचार करू लागला. आईबाबा जे सांगतात ते जर खरं असेल तर वानरांची पळापळ सुरू असताना तो बैलोबा का बरं पळाला? त्याने आपल्या मनात आलेला प्रश्न बाबांना विचारला. याचं उत्तर काही त्यांना देता आलं नाही.

पिल्लू वानरास आई म्हणाली, “अरे तो शक्तिशाली बैलोबा कशासाठी पळेल? वेंधळाच आहेस तू.’’ आई त्याला खिजवत म्हणाली.

पिल्लू वानरास आईच्या बोलण्याचा राग आला, पण त्याने तो गिळून टाकला. बैलोबाला पळताना दाखवून दिल्याशिवाय कुणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही याची त्याला खात्री पटली. दुसरा दिवस उजाडला.

पुन्हा बागेमध्ये वानरटोळी आली. पिल्लू वानरांची धम्माल मस्ती सुरू झाली. काल ज्या पिल्लू वानराने बैलोबाला पळताना बघितलं होतं, तो बैलोबाच्या येण्याकडे डोळे लावून बसला. त्यामुळे तो इतर पिल्लू वानरांसोबत दंगामस्तीत सामील झाला नाही. त्याच्या आजोबांच्या ही बाब बरोबर लक्षात आली. आजोबांनी त्याच्या जवळ येऊन काय झालं असं विचारलं. त्याने बैलोबाची वाट बघत असल्याचं सांगितलं. “बैलोबा आला तर काय घडतं हे बघण्यासाठी तुम्हीसुद्धा पळू नका, सध्याच्या ठिकाणी बसून रहा,’’ अशी गळ त्याने आजोबांना घातली. नातवासाठी आजोबांनी पळून न जाण्याचं मान्य केलं.

दुपारच्या समयी बैलोबा रमतगमत त्या ठिकाणी आले. वानर टोळी असलेल्या जागेवरून बैलोबा जाऊ लागले. तेव्हा पुन्हा सर्व वानर मंडळी इकडे तिकडे पळू लागली. ते बघून बैलोबाही पळू लागला. पिल्लू वानराने आजोबांच्या ते लक्षात आणून दिलं. बैलोबा निघून गेल्यावर आजोबांसोबत पिल्लू वानर आईबाबांकडे परतला. आजोबांनी आज बैलोबा पळताना बघितल्याचं त्याने आईबाबांना सांगितलं. आजोबांनी होकारार्थी मान हलवली. त्यामुळे आईबाबांना पिल्लू वानरावर विश्वास ठेवणं भागच होतं.

“मग आता सांगा, आपण सगळे पळत सुटलो तेव्हा शक्तिमान बैलोबाही का पळत सुटला?’’ पिल्लू वानराने विचारलं. आईबाबांना याचं काही उत्तर सुचेना. त्यांनी आजोबांकडे बघितलं तर त्यांनाही काही सुचेना.