साथीच्या आजारात आरोग्य सांभाळा

>> वैद्य सत्यव्रत नानल

पावसाळा सुरू झाला आहे. काही दिवसांपासून साथींचे रोग होणेही सुरू झाले आहे. ताप, सर्दी, खोकला हे तिन्ही तर कोविडनंतर गेलेलेच नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यात भर म्हणून सध्या जुलाब, पोटदुखी, अपचन, आव पडणे हे पचनाचे विकार जोर धरून आहेत. सोबत कावीळ, नागीण आणि इतर त्वचारोगही डोपं वर काढत आहेत. अशा वेळी दैनंदिन जीवनात सर्वांनी घेण्याची काळजी, पालन करण्याचे नियम समजून घेतले तर स्वास्थ्य उत्तम टिकेल आणि त्रास होणे टाळता येणे शक्य होईल.

 जेवणात या दिवसांत सुंठ, काळी मिरी, हळद आवर्जुन जास्त प्रमाणात, पण त्रास देणार नाहीत असे वापरावेत.

भाज्या काळजीपूर्वक खा

  • पालेभाज्या आणि पंदमुळे या दिवसांत गढूळ पाण्याने खराब येतात. त्यामुळे शक्यतो खाणे टाळावे हेच उत्तम. क्वचित कधीतरी खायचे असेल तर आधी खाण्याचा सोडा किंवा खडे मिठाच्या कोमट पाण्यात 10 मिनिटे भिजवून नंतर स्वच्छ पाण्यात धुवावे आणि मग वापरावे. जसे पालक, मेथी, शेपू, करडई, माठ अशा पालेभाज्या किंवा फक्त पावसाळी मिळणाऱया पालेभाज्या. त्याचप्रमाणे आले, लसूण, अळूचे पंद, सुरण यांना भरपूर माती लागलेली असते. ती धुऊन काढून टाकणे आवश्यक असते. नाहीतर काविळीसारखे रोग होतात.
  • या दिवसांत फळभाज्यांवर जोर ठेवावा. जसे दुधी, पडवळ, दोडका, शिराळी, तोंडली, भेंडी इत्यादी. या दिवसांत म्हणजे पावसाळ्यात भरली वांगी हा प्रकार उत्तम काम करतो. ज्यांना पोटात गॅसेस होतात त्यांनी मात्र खाऊ नयेत.
  • कडधान्य या दिवसांत वारंवार खाल्ल्याने पोटदुखी, गॅसेस, बद्धकोष्ठता असे त्रास होतात. त्यामुळे पावसाळ्यात कडधान्य खायची नसतात. विशेषतः पावटे, वाल, छोले, राजमा, हरभरे यांनी पचन सहज बिघडते. पोट दुखते, जुने मूतखडे असतील तर त्यांचे दुखणे अचानकपणे सुरू होऊ शकते.

 इतर नियम कोणते

पावसाळ्यात आपण स्वतःला अनेक जंतूंच्या संपका&त आणत असतो हे लक्षात ठेवावे. त्यामुळे जाण्यापूर्वी अंगाला निलगिरी तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून चोळावे. सहलीवरून परत आल्यावर गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. त्या वेळी सर्वांगाला तुरटी घासावी किंवा तुरटी मिसळलेल्या गरम पाण्याने आंघोळ करावी.

भूक लागल्यावर खावे

पावसाळ्यात पचन मंदावलेले असते. त्यामुळे भूक लागल्यावरच खावे. भूक नसेल तर भरपेट खाऊ नये. याच वेळी पाणी खराब असल्याने गुरांनासुद्धा अनेक त्रास होतात. त्यामुळे दुधाचे विविध पदार्थ खाऊ नयेत. पावसाळ्यात फक्त चालते ते म्हणजे दही. कसे खावे, तर ताजे दही आणि मध एकत्र करून सकाळी किंवा दुपारी जेवणासह खावे. बाकी पदार्थ शक्यतो टाळावेत.

चातुर्मासात मांसाहार टाळावा.खायचेच असेल तर कमी प्रमाणात खावे. या दिवसांत मांस कोरडे भाजून (टिक्का, तंदुरी, कबाब इत्यादी) खाऊ नये. त्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो. रस्सा बनवून नीट शिजवून खावे.

पाणी उकळून प्या

पावसाळ्यात सर्वात जास्त दूषित असते ते म्हणजे पाणी. फिल्टर केलेले पाणीसुद्धा बऱ्याच वेळा त्रास देऊ शकते. म्हणून पिण्याचे पाणी तरी किमान फिल्टरमधून काढून नंतर उकळून ठेवावे.  पाणी उकळून घ्या किंवा न घ्या, त्यात रात्रभर सुंठ, मिरी, घालून ठेवावी. याने पचनाचे विकार, आव पडणे टाळले जाते.