विज्ञान रंजन – आठ समयक्षेत्रातील प्रवास!

>> विनायक

‘ट्रान्ससिब’ या लोकप्रिय नावाने ओळखला जाणारा रेल्वेमार्ग म्हणजे रशियातील ट्रान्स सायबेरियन रेल्वे. रशिया हा जगातला सर्वात जास्त भूविस्तार असलेला देश आहे. 17 कोटी 98 हजार 242 चौरस किलोमीटर पसरलेला हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातला देश पृथ्वीवरच्या एकूण भूभागाच्या 11 टक्के जागा व्यापतो. त्याचा थोडासा भाग युरोप तर बहुतेक भाग आशिया खंडात आहे. युरोपातील पोलॅण्डला एका बाजूला जोडलेला हा देश पूर्वेकडे थेट जपानच्या दारात पोचलाय. युरोपमधील अनेक देशांच्या सीमा रशियाशी संलग्न आहेतच, पण आशियामधील मंगोलियाच्या डोक्यावरून जाणाऱ्या रशियाची काही सीमा चीनलाही भिडते. पोलॅण्ड, लिथुआनिया, नॉर्वे, फिनलॅण्ड, इस्टोनिया, लॅटविया, बेलारूस, युव्रेन, जॉर्जिया, अझरबैझान, कजाकिस्तान, चीन, मंगोलिया आणि उत्तर कोरियाच्या सीमा रशियाला स्पर्श करतात.

इतक्या मोठय़ा देशात रेल्वेमार्गाचं जाळं निर्माण करणं ही गोष्ट एकोणीसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सोपी नव्हती. आजच्यासारखी टनेल बोअरिंग यंत्रं किंवा रोबॉटिक यंत्रणा उपलब्ध नव्हती. केवळ यंत्र-अभियांत्रिकी म्हणजे मेपॅनिकल इंजिनीअरिंग पद्धतीने अनेक कामगारांच्या अपरिमित कष्टातून असे प्रचंड प्रकल्प उभे करावे लागत असत. तेव्हा हिंदुस्थानाच्या पाच पट विस्तार असलेल्या देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत रेल्वे लाइन टाकणं किती जिकिरीचं ठरलं असेल कल्पना करा.

तर या ट्रान्ससिब किंवा ग्रेट सायबेरियन रेल्वे मार्गाचा विचार रशियन राजा ‘झार’च्या काळात 1891 मध्ये झाला आणि 1904 मध्ये त्याची पूर्तता झाली, मात्र हा 9 हजार 289 किलोमीटरचा सिंगल ट्रक मार्ग त्या वेळच्या रशियन धोरणाने फारसा मजबूत बनवला नव्हता. रुळांसाठी वापरलेलं लोखंड अनेकदा कच्चं राहिल्याने त्यांना तडे जाण्याचे प्रकार जास्त होते. त्याशिवाय सायबेरियाची थंडी आणि बर्फाळ प्रदेश, त्यातच रशिया आणि जपान युद्धातील रशियाचा पराभव अशा कित्येक कारणांनी रडतखडत या लोकमार्गाची आखणी सुरू होती, मात्र त्या काळात तुलनेने विरळ वस्ती असलेल्या सायबेरियाचा मॉस्कोशी संपर्क साधणारी साधनं फार कमी होती. ओब नदीतून 1844 मध्ये सुरू झालेली स्टीमबोट थंडीत नदी गोठली की निकामी ठरायची.

युरोपमधून मॉस्को (रशियन उच्चार मस्क्वा) निघणारी ही ट्रान्ससिब ट्रेन आठ दिवसांनी जपानला जवळ असलेल्या रशियाच्या अतिपूर्वेकडच्या व्लॉडिव्होस्तोक शहरात पोचते. नऊ हजार किलोमीटरच्या अंतरामुळे आठ समयक्षेत्र (टाइम झोन) तिला बदलावी लागतात. घडय़ाळात तसा बदल करावा लागतो. आरंभीच्या अनेक मर्यादा पार करून हा रेल्वेमार्ग युरोपीय इंजिनीअरांच्या देखरेखीखाली बांधला गेला असला तरी काम करणारे 85 हजार कामगार दिवसरात्र राबत होते. तो काळ विजेच्या दिव्यांचा नव्हता. आताच्या हिशेबाने हा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी 25 अब्ज डॉलर्स खर्च झाला. म्हणजे रुपयात किती ते गुणाकाराने ठरवा.

या मार्गावर 87 मोठी शहरं आणि गावं आहेत. मॉस्को आणि व्लॉडिव्होस्तोक या स्टेशनांची बांधणी जवळपास सारखीच आहे. हा रेल्वेमार्ग युरोपात 1777 किलोमीटर तर आशियात 7512 किलोमीटर जातो. पर्व्हलास्क येथे उरल पर्वतात या ट्रेनमधून ‘युरोप-आशिया सीमादर्शक’ स्तंभ दिसतो. व्होल्गा, ओब, उसुरी अशा प्रचंड नद्या पार करत ही ट्रेन धावते. बैकल सरोवरच्या एका काठावरून ही ट्रेन 200 किलोमीटरचा निसर्गरम्य प्रवास करते. रेल्वेचा मोगोका-स्कोवोरोडिनो भाग अत्यंत शीत प्रदेश आहे. इथलं तापमान -62 अंश सेल्सियस असतं. समुद्रसपाटीपासूनचा या रेल्वेमार्गाचा उत्तुंग बिंदू पाब्लोन पास (खिंड) येथे 1040 मीटर उंचीवर आहे. अमूर नदीखालून जाणारा बोगदा 7200 मीटरचा आहे. आता तिथे नदीवरचा पूलही आहे. या रेल्वेचा विस्तार चीनमधील प्यॉन्ग्यांगपर्यंत झाल्यावर आता एकूण लांबी 11 हजार किलोमीटरपर्यंत गेली आहे. रोजचा सुमारे 1400 किलोमीटरचा प्रवास करत ट्रान्ससिब ट्रेन आठ दिवसांत हे अंतर पार करते. आता दोन ट्रक आणि विजेवर चालणारी ही ट्रेन प्रवाशांना एक आगळावेगळा अनुभव देते. आठ दिवस राहण्याची उत्तम सोय आणि चविष्ट जेवण या ट्रेनमध्ये मिळते. काही खुर्च्या लाकडी कोरीवकामाने नटलेल्या असतात. या प्रवासाच्या आणखी अनेक गोष्टी सांगता येतील. या प्रवासाला ‘ट्रान्स सायबेरियन अॅडव्हॅन्चर’ असंही म्हटलं जातं. व्होल्गा नदीवरचा लांबच लांब पूल आणि बैकलचे दर्शन आणि बर्फाळ निसर्ग दाखवत प्रवास सुरूच राहतो. गोबी वाळवंट पार केल्यावर गदिलो स्तोकचे वेध लागतात. आता ही ट्रेन जपानलगतची दोन बेटं जोडून टोकियोपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे.