आयुष्यमती गोदावरी चंदन

वर्षा चोपडे / उमेद

जगा आणि जगू द्या, हे तत्त्व अंगिकारणाऱ्या गोदाआजी म्हणजे उत्साहाचा निर्मळ झरा. प्रेम, माया, आपुलकी यांच्याशी गाठभेट होणे म्हणजे गोदा आजीचा सहवास लाभणे. सकारात्मक विचार रुजवणाऱ्यांना दीर्घायुष्याचे वरदान लाभते, गोदा आजीही त्यापैकी एक…

क़ुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था ही स्त्राrवर, तिच्या संस्कारांवर अवलंबून असते, असे आपला समाज मानतो. मनुष्य आयुष्यभर आनंदाने जगू शकतो, परंतु आयुष्याच्या संध्याकाळी शेवटच्या दिवसांत त्याला फक्त वेळेवर जेवण आणि केवळ स्वकीयांचा आदर आणि प्रेम हवे असते. उमेदीचे असे आयुष्य लाभलेल्या गोदाआजीलाही असेच भरभरून प्रेम लाभले आहे. या वयोवृद्ध आजीचा जन्म 1919 चा. वय वर्षे 104 च्या जवळपास, पण अजूनही स्पष्ट ऐकू येते. चष्मा नाही. दात पडलेत, पण खाता येतील एवढे शिल्लक आहेत. स्मरणशक्ती आजही शाबूत आहे. सगळे आठवते, पण दूर राहणारे नाती, नातू, पणत्या, खापरपणत्या सगळ्यांची आवडती गोदा आजी सगळ्यांच्या मुलाबाळांची चौकशी करते, आठवण करते. आजही मानसिकरीत्या फिट आहे. वयामुळे त्रास होतात, पण सहनशक्ती आणि जगण्याची उमेद तिचे आयुष्य वाढवत आहे. तिने ब्रिटिश काळ अनुभवला. भयंकर ओला, सुका दुष्काळ बघितला. प्लेगची साथ आणि मृत्यूचे भयंकर तांडव बघितले. कोरोना काळातही ती फिट होती. जन्म- मृत्यू आपल्या हातात नसतो असे तिचे मत आहे.

गोदावरी तुळशीराम चंदन. ब्रिटिशकालीन जन्म. त्यामुळे इंग्रज राजवट त्यांनी बघितली. त्या काळातल्या पद्धतीनुसार लहान वयात लग्न झाले आणि त्या दुर्गवाडा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथे आपल्या चंदन परिवारासोबत राहू लागल्या.

गोदा आजी त्या काळात सधन परिवाराच्या सूनबाई होत्या. पती तुळशीराम राष्ट्रसंत तुकडोजी आणि संत गाडगेबाबांना खूप मानायचे. संत गाडगेबाबा त्यांच्या दुर्गवाडा गावातील पूर्णा आणि उमा नदीचा संगम असलेल्या नदीवर यायचे. त्यांचाही दोघा पतीपत्नीवर प्रभाव होता. गोदा आजी सांगतात, “दापुरा या मामाच्या गावी गाडगेबाबा राहायचे. त्यामुळे दुर्गवाडय़ातही ते यायचे. गाव झाडायचे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायचे. आम्हाला त्यांचा सहज सहवास लाभला. घरात वातावरण चांगले होते. पती तुळशीराम गावातील मारुतीच्या मंदिरापासून रस्ते झाडण्यास सुरुवात करीत, रस्त्यावर पाणी शिंपडीत. त्यानंतर देवपूजा करून शेतात जात असत. घरही सुंदर आणि नीटनेटके असायचे. आजही असते. गावात नदीकिनारी मुरकोजी महाराजांच्या मंदिरात जाणे व्हायचे. त्यांना एकूण सात अपत्ये झाली. पहिली मुलगी जन्मानंतर चार महिन्यांनी गेली. त्यानंतर दोन मुलगे आणि तीन मुलींचा जन्म झाला. सगळ्यांची लग्ने समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे केली. त्यानंतर काही वर्षांत पतीचे निधन झाले. त्या काळात पारिवारिक संबंध प्रेमाचे होते. अहंकार असला तरीही मोठय़ांच्या शब्दांना मान होता. मला गणगोताचा आधार महत्त्वाचा वाटतो, त्यांनी मला खूप प्रेम दिले. कधी कुणाशी वाद केला नाही. अहंकार नव्हताच आणि अहंकार बाळगून करायचे काय? ऊनसावलीसारखे जीवन. आज आहोत, उद्या नाही. हात पसरणाऱयाचा हात नेहमी खाली असतो आणि दान देणाऱयाचा वर असतो. जेवढे दुसऱयाचे भले होईल तेवढे करायचे. प्रामाणिकपणे होईल तेवढी दुसऱयाला मदत केली.” दिसायला अत्यंत देखण्या आणि सामाजिक बंधने पाळणाऱया गोदा आजी सगळ्यांच्या लाडक्या आजी आहेत .

गोदा आजीचा मोठा मुलगा महादेव त्यावेळी सहा महिन्यांचा होता. त्याचे डोळे आले होते. गावात कुणीतरी सांगितले की, जस्ताचे फूल (जंगली जडीबुटी) उगाळून डोळ्यात घातली की, डोळ्याला आराम मिळेल. आजीला आपल्या मुलाचा त्रास बघवेना. त्यांनी ते फूल उगाळून मुलाच्या डोळ्यात घातले, पण दुर्दैव! त्यांच्या मुलाचा एक डोळा कायमचा अंध झाला. त्यानंतर घरच्यांचा रोष आणि स्वतच्या मूर्खपणावर आजी खूप रडल्या. आजही ती वेदना त्यांना जाणवते. मी चूक केली, तुम्ही करू नका. मुलांना योग्य डॉक्टरकडे दाखवा असे त्या म्हणतात.

त्यांच्यात कमालीची शालीनता आहे. त्यांची मोठी मुलगी कांताबाई म्हणते, मी बहिणीमध्ये मोठी. बाबा गेले. त्यानंतर तिने आपल्या दुःखाचा कधीही बाजार मांडला नाही. बाबांची तिला खूप आठवण यायची, पण आपला त्रास तिने कधीही बोलून दाखवला नाही. ती शांतपणे होईल तेवढी मदत सगळ्यांना करायची. कुण्या नातलगांकडे गेली की, रिकामी बसायची नाही. त्यांचे वापरून झालेले, पण नीटनेटके कपडे ती घरी आणायची आणि गावातील गरजूंना वाटून टाकायची. ती गावाला गेली की, गरीब बायका मोठय़ा आशेने ती यायची वाट बघायच्या. मोठा मुलगा गांधीवादी होता. त्याचे देशासाठी खारीचे योगदान होते, पण राजकारणाने पोट भरत नाही असे त्या म्हणायच्या. सुनांना छळणे गोदा आजीला माहीत नव्हते. म्हणूनच त्यांच्या दोन्ही सुना म्हाताऱया झाल्या तरीही गोदा आजीची काळजी घेतात.

आजीचा नातू नरेश आपल्या पत्नीसह, मुलामुलीसोबत आजीची खूप काळजी घेतो. या काळात असा परिवार असला तर म्हातारपण किती आनंदात जाते! पण त्याला कारण आहे गोदा आजीचा स्वभाव आणि मनमिळाऊपणा. गोदा आजीच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे सकारात्मक विचार, कष्ट तसेच ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व.

चुगल्या, चोरी, नकारात्मक गोष्टी यापासून लांब रहा. कुणाशी पटले नाही, तर बोलून वाद करू नका. पैसा शत्रू निर्माण करतो. त्यामुळे दुसऱयाला पैसे मागितले तर त्याला वेळेत परत करा. ‘देव देव’ करून उपयोग नाही, तर रंजल्यागांजल्यात देव आहे ही गाडगेबाबांची शिकवण आचरणात आणली की, जीवन सुकर होते आणि जीवनाचा प्रवास आनंदाचा होतो असे त्यांचे मत आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, कधी आपल्या प्रारब्धानुसार डोक्यावर पाणी वाहण्याची वेळ आली तर पाणीदेखील वहावे, तर कधी कधी सुखाने पलंगावर झोपावे. जशी वेळ येईल त्याप्रमाणे बदल करून घ्यावेत. कधी कधी विविध प्रकारचे पंचपक्वान्न खावे, तर कधी कधी प्रारब्धाने कोरडय़ा भाकऱया मिळाल्या तर त्यादेखील खाव्यात. कधी संपत्तीचा भोग घ्यावा, तर कधी विपत्तीदेखील अनुभवावी. कधी संतसज्जनांची संगत होते तशी दुर्जनांशीही गाठभेट होते, असं गोदा आजी सांगत असतात, ते खरे आहे, कदाचित असे वागणाऱया लोकांना नक्कीच दीर्घायुष्य लाभत असावे…आणि गोदा आजी त्यापैकीच एक आहेत.

> [email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)