ज्ञानोपासक टिळक!

राहुल गोखले / मुद्रा

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढय़ाचे नेतृत्व केले. राजकीय संघर्ष करतानाचा धबडगा, झालेल्या कारावासाच्या शिक्षा यामुळे त्यांना आवडीच्या अन्य विषयांना वेळ देण्यास उसंत मिळणे अशक्य होते. मात्र टिळकांचा मूळ पिंड ज्ञानोपासनेचा होता आणि त्यामुळेच गणितापासून खगोलशास्त्रापर्यंत आणि ज्योतिषापासून कायद्यापर्यंत विविध विषयांतील ज्ञानसाधना त्यांनी साध्य केली.

भारतावर असणारी ब्रिटिश सत्ता संपुष्टात येऊन स्वराज्य स्थापन व्हावे यासाठीच्या स्वातंत्र्य लढय़ाचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी केले. राजकीय संघर्ष करतानाचा धबडगा, झालेल्या कारावासाच्या शिक्षा यामुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या अन्य विषयांना वेळ देण्यास उसंत मिळणे अशक्य होते. तथापि टिळकांचा मूळ पिंड हाच मुळी ज्ञानोपासनेचा होता आणि त्यामुळे जेव्हा कधी त्यांना वेळ मिळे तेव्हा ते तो वेळ गणितापासून खगोलशास्त्रापर्यंत आणि ज्योतिषापासून कायद्यापर्यंत विविध विषयांतील ज्ञानसाधनेसाठी व्यतीत करीत. न. चिं. केळकरांपासून न.र. फाटकांपर्यंत, प्रा. ग. प्र. प्रधान यांच्यापासून गोविंद तळवलकर यांच्यापर्यंत आणि कुमार केतकर यांच्यापासून जयंत नारळीकर यांच्यापर्यंत अनेकांनी टिळकांच्या बहुपेडी जीवनाचा वेध ग्रंथांतून अथवा अन्य लेखनातून घेतला आहे. राजकीय पुढारी म्हणून ‘लोकमान्य’ असणाऱया टिळकांच्या ज्ञानोपासकाच्या पैलूवर त्यातील अनेक प्रसंगांतून प्रकाश पडतो.

गणित हा टिळकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मंडालेच्या कारावासातून सुटका झाल्यानंतर टिळकांनी ‘केसरी’च्या प्रतिनिधीला मुलाखत दिली आणि आपल्याला कारावासाची शिक्षा झाल्यानंतरच्या सर्व घटपामाचे वर्णन केले. त्यातही आपण तुरुंगात असताना गणिताशी, खगोलशास्त्राशी आणि वेदांताशी निगडित काही काही नोंदी केल्या आहेत असे त्यांनी सांगितले होते. 1919 च्या सुमारास गणिताचे प्राध्यापक चंद्रात्रेय यांनी टिळकांची सरदारगृह येथे भेट घेतली तेव्हा टिळकांनी चंद्रात्रेय यांना ‘कॅल्क्युलस’मधील निराळी पद्धत शोधून काढली असल्याचे सांगितले होते, अशी आठवण स्वत चंद्रात्रेय यांनी सांगितली होती.

विद्यार्थी असताना टिळक सामान्यत मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करीत आणि त्यावेळीही गणित हाच त्यांचा आवडीचा विषय होता. एल्फिन्स्टन कॉलेजात शिकताना टिळकांचा लौकिक हा गणित विषयातील बुद्धिमान विद्यार्थी असाच झालेला होता. फर्ग्युसन महाविद्यालयात टिळक स्वत गणिताचे अध्यापन करीत असत. टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते त्यावेळी पांगारकर हे त्यांचे विद्यार्थी होते. विद्यार्थी असतानाच एका भाषणात पांगारकर म्हणाले, “गणित विषय रूक्ष आहे, काव्यरसाची गोडी त्याला कोठून येणार?” टिळकांना हे समजल्यावर त्यांनी पांगारकरांना बोलावले आणि “गणितात काव्य आहे, पण ते समजायला बुद्धीची झेप लागते. तुम्हाला काव्यात जसा सौंदर्याचा साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे ग्रहांच्या गतीचे गणित मांडताना मला सौंदर्याचा साक्षात्कार होतो.” असे पांगारकरांना सांगितले.

मॅक्सम्युलरसारख्या अभ्यासकांनी वेदांचा काळ हा ख्रिस्तपूर्व अडीच हजार वर्षे असावा असा निष्कर्ष काढला होता. मात्र त्याने वापरलेली कालनिश्चितीची पद्धत योग्य नाही असा दावा करून टिळकांनी खगोलशास्त्राrय आधारावर कालनिश्चिती केली. वेदांग ज्योतिषाच्या अभ्यासातून एक नवी रीत वापरून ‘ओरायन’ हा ग्रंथ 1892 साली टिळकांनी लिहिला आणि वेदांचा काळ हा ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षांचा असावा असा निष्कर्ष अभ्यासांती काढला. जॉन हॉपकिन्स इन्स्टिटय़ूटचे डॉ. ब्लूमफील्ड यांनी म्हटले होते की, सुरुवातीस हा ग्रंथ म्हणजे आपल्याला थोतांड वाटले, पण जसजसा आपण हा ग्रंथ वाचत गेलो तसतशी त्यातील प्रतिभा जाणवू लागली. 1898 साली टिळक येरवडय़ाच्या तुरुंगात असताना मॅक्सम्युलरने त्यांना त्याने संपादित केलेली ऋग्वेदाची प्रत पाठवली होती. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात संशोधक आणि अभ्यासक म्हणून टिळकांना पाश्चात्त्य जगतातदेखील मिळालेली मान्यता ध्यानात येईल. तुरुंगात असतानाही टिळक आपला बहुतांशी वेळ हा ऋग्वेदाच्या अभ्यासात घालवत असत.

‘आर्क्टिक होम इन दि वेदाज’ हा ग्रंथ 1903 साली पूर्ण झाला. मात्र त्यापूर्वी सिंहगडावर त्या पुस्तकाचा मजकूर टिळक त्यांचे लेखनिक गोगटे यांना सांगत असत आणि गोगटे तो उतरवून घेत असत. दिवसभरात चौदा-पंधरा तास हा ाढम अनेक दिवस चालला अशी आठवण गोगटे यांनी सांगितली आहे. खरे तर ‘ओरायन’ ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या अखेरीस टिळकांनी लिहिले होते की, ‘माझी अन्य क्षेत्रांतील व्यग्रता पाहता या विषयाला भविष्यात वेळ देता येणे असंभव दिसते.’ मात्र तुरुंगवासाने टिळकांना ती संधी काही वर्षांतच दिली.

मंडालेच्या तुरुंगात टिळकांचे स्वयंपाकी म्हणून राहिलेले वासुदेव रामचंद्र कुलकर्णी यांनी सांगितलेल्या आठवणी टिळकांच्या ज्ञानोपासनेच्या लालसेवर प्रकाश टाकतात. सुटकेनंतर आपल्याला जर्मनीला जायचे आहे असे सांगून आपण जर्मन, फ्रेंच भाषा शिकत असल्याचे टिळकांनी सांगितले होते. वेबरचे खगोलशास्त्रावरचे जर्मन भाषेतील पुस्तक आपण वाचले असे टिळकांनी एका पत्रात लिहिले होते. ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. मात्र त्यामागे त्यांनी केलेले अथक चिंतन कारणीभूत होते. 1902 साली नागपुरात तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना टिळकांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाच्या सिद्धांताचे सूतोवाच केले होते. मंडालेत त्यांनी त्याच संकल्पनेचा विस्तार करीत पेन्सिलीने हस्तलिखित सिद्ध केले. तुरुंगवासातून सुटका झाल्यानंतर टिळकांनी त्याची छपाईयोग्य प्रत बनवली आणि 1915 साली ‘गीतारहस्य’ ग्रंथ प्रकाशित झाला. चिरोल खटल्याच्या संदर्भात टिळक इंग्लंडला गेले होते तेव्हा वेळ मिळेल तेव्हाही ते प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास क्वचितच जात. हाताशी असलेला बहुतांशी वेळ ते इंडिया ऑफिसच्या ग्रंथालयात व्यतीत करीत.

स्वराज्याच्या लढाईत नेतृत्व करीत असल्याने टिळकांना गणितापासून संस्कृतपर्यंत, खगोलशास्त्रापासून कायद्यापर्यंत अनेक विषयांच्या संशोधनासाठी, चिंतन-मनन करण्यासाठी देता आला नसला तरी जेव्हा तो मिळे तेव्हा टिळक ती संधी सोडत नसत. “मनातील ज्ञानसाधनेची ऊर्मी टिळकांनी दाबून ठेवली आणि स्वराज्य मिळविण्याच्या कार्याला आपले जीवन त्यांनी समर्पित केले. याचे कारण टिळकांनी असा विचार केला की, ज्ञानसाधना ही अखेर वैयक्तिक मोक्षसाधनाच आहे आणि आपले देशबांधव पारतंत्र्यात खितपत पडले आहेत तोपर्यंत केवळ ज्ञानमार्गाने जाणे हा वैयक्तिक स्वार्थच ठरेल” असे प्रा. ग. प्र. प्रधान यांनी लिहिले आहे. स्वराज्याच्या लढय़ासाठी टिळकांनी ज्ञानसाधना जाणीवपूर्वक बाजूला ठेवली हे खरे; तथापि ज्ञानोपासना आणि ज्ञानसाधना हा त्यांचा पिंड होता. “स्वतंत्र भारतात राजकीय क्षेत्राचा आपण निरोप घेऊ आणि गणिताचे प्राध्यापक होऊ” असे उद्गार स्वतच टिळकांनी काढले होते. त्यांच्या हयातीत भारताला स्वातंत्र्य मिळाले असते तर कदाचित ‘लोकमान्य’ टिळकांनी स्वतस निखळ ज्ञानसाधनेला वाहून घेतले असते!

> [email protected]