वेब न्यूज – ऑर्डर मोबाईलची, आला बॉम्ब

प्रातिनिधिक फोटो

पेन्सिलपासून ते टीव्हीपर्यंत अनेक वस्तूंची ऑनलाइन खरेदी ही आता नित्याची बाब झाली आहे. अगदी सहजपणे मोबाईलच्या एका क्लिकवर आपण देशाच्या कानाकोपऱयातून कोणतीही वस्तू ऑर्डर करू शकतो आणि काही दिवसांत ती थेट आपल्या दारात हजर होते. या ऑनलाइन खरेदीमध्ये अनेकदा फसवणूकदेखील होत असते. मोबाईलच्या जागी साबणाच्या वडय़ा मिळाल्याचे किंवा दगड मिळाल्याचे किस्से आपण याआधी बरेचदा वाचलेदेखील असतील. मात्र मेक्सिकोमध्ये एका युवकाला चक्क मोबाईलच्या जागी जिवंत बॉम्ब मिळाल्याची घटना घडली आहे, जी सध्या सर्वत्र चांगलीच चर्चेत आली आहे.

मेक्सिकोच्या लियोन प्रांतात राहणाऱया एका युवकाने ऑनलाइन मोबाईल खरेदी केला. काही दिवसांनी त्या मोबाईलची डिलिव्हरी घेऊन डिलिव्हरी बॉय त्याच्या दारात हजर झाला. नेमका त्या दिवशी तो युवक काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता आणि त्याची आई फक्त घरात होती. त्याच्या आईने ते पार्सल घेतले आणि न उघडता तसेच डायनिंग टेबलवर ठेवून दिले. काम संपवून घरी आलेल्या युवकाने मोठय़ा उत्सुकतेने ते पार्सल उघडायला घेतले आणि आतली वस्तू पाहून त्याची बोबडीच वळली. पार्सलमध्ये मोबाईलच्या जागी अत्यंत व्यवस्थितपणे पॅक केलेला एक जिवंत बॉम्ब होता. पार्सलमध्ये बॉम्ब पाहून घाबरलेल्या त्या युवकाने तातडीने त्या पार्सलचा पह्टो काढला आणि संबंधित मोबाईल पंपनीशी संपर्क साधला. आधी त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हते, मात्र युवकाने पार्सलचा पह्टो पाठवल्यावर त्या मोबाईल पंपनीला प्रसंगाच्या गांभीर्याची जाणीव झाली आणि पंपनीने तातडीने बॉम्ब स्क्वॉडशी संपर्क साधला आणि त्यांना ही घटना कळवली. बॉम्ब स्क्वॉडने तातडीने घटनास्थळी रवाना होत काही तासांच्या मेहनतीनंतर तो बॉम्ब डी-ऑक्टिवेट करण्यात यश मिळवले. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे गेले असून बॉम्बसारखी घातक वस्तू चक्क कुरियरने पाठवण्यात आल्याने पोलीसदेखील अत्यंत गंभीरपणे त्याचा तपास करीत आहेत.