आभाळमाया – दिवस-रात्र समसमान

>> वैश्विक

‘दिवसामागून दिवस चालले, ऋतुमागुनि ऋतु…’ असं गदिमांचं, आशाताईंनी गायिलेलं अप्रतिम गाणं आहे. त्यांचं संगीत सुधीर फडके यांचं. त्या गाण्याची आठवण आली ती परवा न्यूझीलँडमधल्या एका तरुण मित्राशी बोलताना. तो म्हणाला, ‘आम्ही आता उन्हाळय़ाला कंटाळलो आहोत. तेव्हा आता थंडी आमच्याकडे पाठवा..’ यावर म्हटलं, ‘याचा अर्थ उन्हाळा तुम्ही घ्या असंच ना..’ तसंच आता घडतंय. आजच सूर्य ‘न चालताही चालत’ पृथ्वीच्या विषुववृत्तावर तळपत आहे. आस्ते कदम तो पुढे सरकत दक्षिण हिंदुस्थानवरून महाराष्ट्रावरही येईल. मे महिन्यात कडक उन्हाळा आपल्याला जाणवायला लागेल.

त्यातही अनेक दिवस सूर्य राज्यातल्या अनेक गावांच्या, शहरांच्या माथ्यावर मध्यान्ही येईल. अर्थात त्या तारखा वेगवेगळय़ा असतील. उदाहरणार्थ मुंबईवर पंधरा-सोळा मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने आपली सावली आपल्या पायात पडेल. तोच शून्य सावलीचा दिवस पिंवा ‘झीरो शॅडो डे.’ गेली कित्येक वर्षे, ‘सन-तापा’ची काळजी घेऊन म्हणजे टोपी वापरून, आम्ही तो अनुभवत आहोत.

अर्थात त्याला आणखी थोडा वेळ आहे. आजपासून आपल्याकडे वसंत ऋतूची चाहूल लागेल. उष्ण वारे वाहू लागतील. आंब्यासारखी फलदायी झाडं मोहरतील. तसे आंबे आत्ताच बाजारात आलेत म्हणा, पण त्यांचं प्रमाण वेगानं वाढेल. रानावनात वाढणाऱया पळस, सावर अशा मोठय़ा झाडांवर लालेलाल फुलांची आरास दिसेल. ऊन पिऊन तृप्त झालेला चाफा, निष्पर्ण झाला तरी सोनफुलांमधून सुगंध उधळत राहील. कुणी म्हणेल, एवढं काव्यात्म वर्णन खगोलीय लेखात कुठे? पण आपली पृथ्वी आणि त्यावरचे ऋतुचक्राचे भ्रम-विभ्रम या साऱ्या गोष्टीसुद्धा खगोलाचाच भाग आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास अवकाशाचा वेध घेऊन होतो हे खरंच, पण कधीतरी पदतळीच्या ग्रहांकडेही आपलं लक्ष जायला हरकत नाही.

विषय चालला होता ऋतुचक्राचा. गेली साडेतीन ते चार कोटी वर्षे अव्याहतपणे ते सुरूच आहे. त्याबद्दलची माणसाची जाणीव फार तर काही लाख वर्षांची आणि अनुभव तर केवळ काही हजार वर्षांचा. आरंभीच्या काळात ऋतुचक्राशी आपलं जीवन जुळवून घेताना माणसाला त्रासच झाला असणार, पण जसजशी एकेक संस्कृती उदयाला आली, स्थिर वसाहती निर्माण झाल्या तेव्हा त्या त्या संस्कृतीनुसार, त्या त्या भागात ऋतुसंक्रमण उत्सवी स्वरूपात साजरे केले जाऊ लागले. आपल्या मराठी दिनदर्शिकेनुसार चैत्र प्रतिपदा किंवा पाडवा हा वर्षाचा पहिला दिवस. कर्नाटकातही नवं वर्ष ‘उगादी’ नवाने तेव्हाच सुरू होतं, परंतु इतर प्रांतात त्यांचं नववर्ष वेगवेगळय़ा वेळी सुरू होत असतं.

आज विषुववृत्तावर असलेला सूर्य हळूहळू सरकत उत्तरायण पूर्ण होईपर्यंत म्हणजे 21 जूनपर्यंत उज्जैनवर जाईल. सूर्याच्या या उत्तर गोलार्धातल्या साडेतेवीस अक्षांशापर्यंतच्या प्रवासाचा आज-उद्या आरंभबिंदू. त्याचं उत्तरायण म्हणजे दक्षिण गोलार्धावरून उत्तरेकडे सरकणं तर 22 डिसेंबरलाच सुरू झालंय.

सूर्य आपल्याकडे चैत्र-वैशाख वसंतऋतु घेऊन येईल तो 9 एप्रिलला. त्याच दिवशी आपला पाडवा. तसाच वसंतोत्सव अमेरिकेत मात्र जूनमध्ये असेल. कारण तेवढय़ा अक्षांश, अक्षांशासहित पोहोचायला सूर्याला थोडा वेळ लागेल. सूर्याच्या या ‘चालण्याची’ गंमत म्हणजे पृथ्वीवरच्या साडेतेवीस अक्षांश दक्षिण ते साडेतेवीस अक्षांश उत्तर एवढय़ाच भागात तो बरोबर माथ्यावर येतो. त्यामुळे इतक्याच भागात ‘शून्य सावली’चा दिवस अनुभवता येतो. दिल्लीमध्येही असा दिवस येत नाही. यूरोप, अमेरिका, चीन, रशिया यांना आणि न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया या देशांच्या निदान दक्षिण भागांना या नैसर्गिक ‘चमत्कारा’चा अनुभव घेता येत नाही.

सूर्याच्या या दक्षिणोत्तर आभासी भ्रमणाचं कारण म्हणजे सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱया पृथ्वीचा स्वतःच्या अक्षाशी असलेल्या साडेतेवीस अंशांचा कल. तो नसता तर आपल्याला ‘सहा ऋतुंचे सहा सोहळे’ निसर्गनियमाने दिसलेच नसते. समजा, पृथ्वी ‘युरेनस’सारखी अक्षाशी 90 अंशाचा कल करून सूर्याभोवती फिरत राहिली असती तर एका बाजूला सहा महिने कडक उन्हाळा आणि दुसऱया बाजूला अतिशीत हिवाळा जाणवला असता.

तशा परिस्थितीत कदाचित मधल्या समशीतोष्ण पट्टय़ात वस्ती झाली असती का? जैविक उत्क्रांती घडली असती का? हॅबिटेबल झोन म्हणून पृथ्वीचं नेमपं काय स्वरूप राहिलं असतं? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. लवकर आधी ‘ड्रेक इक्वेशन’नुसार पृथ्वी वस्तीयोग्य कशी ठरली त्याची माहिती घेऊ आणि त्यातही पृथ्वीच्या विशिष्ट चलण्याने आणि चंद्राच्याही अस्तित्वाने, पृथ्वीवर आधी एकपेशीय सजीव आणि मग आपली म्हणजे माणसांची प्रगत आणि बुद्धिमान (!) प्रजाती कशी निर्माण झाली त्याविषयी सांगता येईल.

अधूनमधून खगोलातल्या पृथ्वी नावाच्या ग्रहाची माहितीही घेत राहू या. कारण तीही सेपंदाला 30 किलोमीटर वेगाने अंतराळातच सूर्याभोवती फिरत आहे. पृथ्वीचं जनकतारा सूर्य आणि सहयोगी चंद्र यांच्याशी वैश्विक योगायोगाचं मनोरंजक नातं आहे. विज्ञानाने त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे आणि पृथ्वीवरच्याच अनेक गोष्टींची माहिती आपल्याला व्हायची आहे. त्यासाठी हवं कुतूहल आणि अभ्यास. इतकंच!

[email protected]