आभाळमाया – ‘डेव्हिल’ धूमकेतू?

>> वैश्विक, [email protected]

हॅलीचा धूमकेतू दर 76 वर्षांनी येतो, हे आता सर्वांना पाठ झालंय. कारण या धूमकेतूइतकी इतर कोणत्याच धूमकेतूची चर्चा झाली नसेल. 1910 मधले त्याचे दर्शन विलक्षण प्रेक्षणीय तर होतेच, पण त्याची उत्तम स्थिती फोटो घेणाऱयांनाही मोहात पाडणारी होती. फोटोग्राफीचा शोध लागल्यानंतर झालेल्या हॅलीच्या पुनरागमनाने जगाला धूमकेतू नुसता दिसलाच असे नव्हे, तर पुढच्या पिढय़ांसाठी ‘टिपून’ आणि जपून ठेवता आला, तो कॅमेऱयाच्या करामतीने. त्यावेळी आपली पृथ्वी हॅलीच्या विशाल पिसाऱयासारख्या शेपटातून पसार झाली होती.

अर्थात, तोपर्यंत कर्मकांडाने घातलेली धूमकेतूंची भीती गडद होती. ‘हॅली’च्या दुष्परिणामातून ‘वाचण्यासाठी’ युरोपात ‘पापविमोचक पास’ दिले गेल्याचे बोलले गेले. मात्र त्याचे दर्शन लाखो लोकांनी, थोडे दबकत का होईना, पण घेतले आणि धूमकेतूंबद्दलच्या वैज्ञानिक जाणिवेला वेग आला. पुढच्या काळात धूमकेतू पाहणे, दुर्बिणीद्वारा त्याचे निरीक्षण करणे अशा गोष्टी जनमानसात रुजल्या. धूमकेतूमुळे काहीतरी विपरीत होईल अशा समजुतींना विराम मिळाला. आमचे ‘खगोल मंडळ’ तर याच धूमकेतूच्या निमित्ताने (1986) आकाराला आले आणि गेली सुमारे चाळीस वर्षे आम्ही हजारो लोकांना रात्रभराची, आकाशीची दौलत दाखवत आलो.

सांगायचा मुद्दा असा की, ‘हॅली’मुळे धूमकेतू हे अचानक येत नाहीत. त्यांची कक्षा ठरलेली असते, तशीच त्यांची येण्याची वेळही निश्चित असते हे लक्षात आले. ‘धूमकेतू इतके वेळ पाळणारे’ असा शब्द प्रयोग खरं तर आता करायला हवा. गेल्या चार दशकांत हेल बॉप, याकुताके यासारखे सुंदर धूमकेतू पाहता आले. शुमेकर-लेव्ही-9 हा धूमकेतू गुरू ग्रहावर कसा कोसळला त्याचे चित्रण कॅमेऱयाने केले. कालपरवापर्यंत गूढ असलेले धूमकेतूंचे ‘जग’ समजणे सोपे झाले.

तरीही एखाद्या धूमकेतूला ‘डेव्हिल’ किंवा ‘दैत्य’ वगैरे नाव देण्याचा मोह युरोप-अमेरिकेत होतोच. सध्याचंच उदाहरण घ्या ना. पॉन्स-ब्रूक नावाचा धूमकेतू आता सूर्यमालेत आहे. दर 71 वर्षांनी येणारा हा धूमकेतू प्रथमच पृथ्वीवरून बऱयापैकी दर्शन देणार आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात अधिक चांगला दिसेल.

कसा आहे हा धूमकेतू? त्याचा शोध कोणी लावला? त्याला ‘हॅली पद्धती’चा धूमकेतू का म्हणतात? इत्यादी गोष्टी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 20 ते 200 वर्षांच्या कालावधीत जे धूमकेतू वारंवार सूर्यमालेला भेट देतात ते ‘हॅली टाइप कॉमेट’ समजले जातात. पॉन्स ब्रुक ऊर्फ ‘डेव्हिल’ त्यातलाच एक. गेल्या 7 मार्चला या निळसर दिसणाऱया धूमकेतूचा फोटो गुगलवर आला आहे.

1812 च्या जुलै महिन्यात मार्सेलिस वेधशाळेतून जीन पॉन्स यांनी प्रथम हा धूमकेतू पाहिला. 1883 मध्ये तो पुन्हा आल्यावर विल्यम ब्रुक्स यांनी त्याचे निरीक्षण केले. त्यामुळे त्याला या दोघांचे नाव मिळाले. त्यावेळी जसा तो सूर्यसान्निध्य आला होता तसाच 1954 मध्येही होता आणि 2024-25 मध्येही तो आपल्या सौरसंकुलात दिसतोय. 2 जून 2024 रोजी तो पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. परंतु आताही दुर्बिणीतून दिसू शकतो. एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ात आम्ही तो पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

30 किलोमीटर व्यासाचा हा धूळ आणि बर्फाचा गोळा धूमकेतू म्हणून ‘उर्ट क्लाऊड’मधून निघाल्यापासून अवकाशात कधी सूर्य-पृथ्वी अंतराच्या 33 पट अंतरावर असतो, तर कधी उपसूर्य (पेरिहेलियन) म्हणजे सूर्याजवळ येतो. सध्या तो सूर्याजवळ असल्यानेच आपल्याला दिसेल. सूर्योदयापूर्वी काही काळ किंवा सूर्यास्तानंतर काही काळ त्याचे दर्शन निरभ्र आणि प्रदूषणमुक्त आकाशात होईल. त्यासाठी पूर्व-पश्चिम क्षितिजे मोकळी आहेत अशा ठिकाणी मात्र जायला हवं.

तसे याचे ‘दर्शन’ 1385 पासून वारंवार झाल्याच्या नोंदी आहेत; परंतु फोटोग्राफीच्या काळात आता त्याच्या स्मृती कुणालाही कॅमेराबद्ध करणे शक्य आहे. 1954 मध्ये त्याची शेपूटही लांबलचक दिसली होती. त्याच्या गाभ्यात अनेकदा झालेल्या ‘आऊटबर्स्ट’मुळे (विस्फोट) त्याचे तेज वाढले असले तरी त्याची दृश्य-प्रत नुसत्या डोळय़ांनी स्पष्ट दिसावी अशी नाही. शिवाय तो सूर्याजवळ असल्याने सौरतेजात गुरफटण्याची शक्यता आहेच.

यावेळी एक विशेष घटना घडतेय. ती म्हणजे, येत्या 8 तारखेला अमेरिका खंडातून मेक्सिको ते उत्तर पूर्व यूएस अशा पट्टय़ात ‘खग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. हवा ढगाळ नसेल तर चार मिनिटांची टोटॅलिटी किंवा खग्रास-सूर्यस्थिती पाहण्याची पर्वणी आली आहे. त्यासाठी जगभरचे खगोलप्रेमी वर्षभर आधीपासूनच या भागात राहण्याची सोय करून तयार आहेत. निसर्गाने साथ दिली तर चार मिनिटे झाकला जाणारा सूर्य आणि कधी न दिसणारा चंद्राचा काळोखी भाग निरीक्षकांना पाहता येईल. आम्ही अशा चार-पाच ग्रहणांचा अनुभव योगायोगाने 1980 पासून घेतला आहे. त्याविषयी आणि 8 तारखेच्या विशेष ग्रहणाविषयी पुढच्या लेखात. तोपर्यंत कदाचित एखाद्या मित्राकडून त्याचे फोटोही येतील. याच चार मिनिटांच्या खग्रास सूर्यकाळात प्रेक्षकांना बुध-शुक्रासारख्या सूर्य-संन्निध ग्रहांप्रमाणेच ‘डेव्हिल कॉमेट’चेही दर्शन झाले तर सोन्याहून पिवळे. परंतु तो सूर्याच्या अगदी जवळ येतोय 21 एप्रिलला. पाहूया कधी नि कसा दिसतो ते.