सिनेमा- थलाइवा

>> प्रा. अनिल कवठेकर

तामीळ चित्रपटातील अत्यंत मोठा असा सुपरस्टार रजनीकांत. केवळ तामीळच नव्हे, तर जगभरात त्याचे चाहते आहेत. म्हणूनच चाहत्यांचे प्रेम असो वा एक अभिनेता म्हणून गाजलेली कारकीर्द, रजनीकांत अनेक बाबतीत कायम अपवादात्मक ठरला आहे. आज वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षीसुद्धा त्याला तेच प्रेम त्याच्या फॅन्सकडून मिळत आहे.

रजनीकांत – एक सुपरस्टार म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, पण एक व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर वयाच्या 75 च्या जवळपास पोहोचत असतानाही  तरुणाईला लाजवेल असा फिटनेस त्याने छानपैकी जपलेला आहे. रजनीकांतची मातृभाषा मराठी याचा अर्थात आपल्या सगळ्यांना अभिमान आहेच. त्याचं नाव शिवाजीराव गायकवाड. त्याने ‘रजनीकांत’ हे नाव धारण केलं आणि आज तामीळ चित्रपटातील अत्यंत मोठा असा तो सुपरस्टार  झालेला आहे. आम्ही हिंदी चित्रपट पाहण्याचे शौकीन होतो. त्या काळात तामीळ वगैरे चित्रपट पाहणं तसं परवडत नव्हतं, पण 1984च्या दरम्यान  व्हिडीओची साथ आली आणि शंभर रुपयांत चार-पाच पिक्चर पाहता येत. आम्ही चाळीत राहणारी मंडळी दहा रुपये, पाच रुपये अशी वर्गणी काढून शंभर रुपये गोळा करायचो, रंगीत टीव्ही आणि व्हिडीओ भाडय़ाने आणून रात्रभर अंगणात जागत चित्रपट पहायचो. तेव्हा आम्ही त्याचा पहिला चित्रपट पाहिला होता तो म्हणजे ‘गंगवा’ होय.

तो चित्रपट म्हणजे त्या काळात सावकार, जमीनदार गरीब शेतकऱयांना लुटायचे आणि त्यामुळे त्या सावकारांना धडा शिकवण्यासाठी काही लोक डाकू व्हायचे. असा हा डाकू म्हणजे गंगवा होय. हे डाकू म्हणजे एक प्रकारचे

रॉबिनहूडच. सावकार, जमीनदार यांची गोदामं लुटायची आणि ती गरीबांना वाटायची. अशा प्रकारचे एक सामाजिक काम करणारे ते डाकू होते. चित्रपट तसा सामान्यच होता; पण संपूर्ण चित्रपटापेक्षा यातील शेवटचे हाणामारीचे दृश्य माझ्या कायम लक्षात राहिले. कारण अशा प्रकारची हाणामारी मी पहिल्यांदाच पाहत होतो. गंगवाचा पाठलाग करत डीएसपी गंगवाच्या जंगलातील अड्डय़ावर पोहोचतो. आमच्या लहानपणी ‘दारूचा अड्डा’, ‘मटक्याचा अड्डा’ आणि  ‘गुंडांचा अड्डा’ असे शब्द चांगलेच प्रचलित होते. तिथे डीएसपी आणि ‘गंगवा’ म्हणजे रजनीकांत यांच्यामध्ये बराच वेळ हाणामारी होते. इतक्यात पोलिसांचे दल तिथे येते आणि रजनीकांतला तिथून पळ काढावा लागतो, पण गंमत अशी की, पोलीस जेव्हा गंगवाच्या अंगावर हँडबॉम्ब फेकतात तेव्हा गंगवा ते हँडबॉंब ािढकेटचा वेगाने येणारा चेंडू कोणत्याही फलंदाजाला जितक्या सहजतेने पकडता येणार नाही, तितक्या सहजतेने पकडतो. कधी आपल्या उजव्या हातात, कधी आपल्या डाव्या हातात, कधी हवेत उडून, कधी हवेत झोके घेऊन, तर कधी हवेत कोलांटी उडी मारून तर कधी मागच्या हातात. ते

बॉम्ब पकडून पुन्हा पोलिसांच्या अंगावर फेकतो आणि त्यांना ठार करतो. तो टारझनप्रमाणे वेलींच्या सहाय्याने या झाडावरून त्या झाडावर झोके घेत जातो. रजनीकांतची स्टाईल त्या वेळेस आम्हाला तितकी पटली नव्हती. रजनीकांत हा त्या काळात दक्षिणेत खूप लोकप्रिय होता अन् पुढे आम्हाला हळूहळू रजनीकांत म्हणजे काय हे समजायला लागलं आणि त्याचे चित्रपट कशाकरिता पाहिले पाहिजेत हेही समजायला लागलं.

रजनीकांत सुपरस्टार झाला आणि लोक त्याला ‘थलाइवा’ म्हणू लागले. ‘थलाइवा’ या शब्दाचा तामीळ भाषेमध्ये अर्थ होतो ‘नेता’ किंवा ‘बॉस’. जसे इंग्रजीमध्ये एखाद्या सन्माननीय माणसाला मोठेपणा देण्यासाठी त्याला ‘सर’ बोलण्याची प्रथा आहे, तसा हा तामीळ भाषेमध्ये ‘सर’ याच सन्मानाने येणारा शब्द आहे. हा शब्द ‘थला’वरून आला आहे. याचा अर्थ आहे शीर्ष, डोके. जो लोकांचे नेतृत्व करतो तो ‘थलाइवा’ अर्थात रजनीकांत होय. रजनीकांतचे चित्रपट आपण दोन प्रकारांत पाहू शकतो. एक- तो सुपरस्टार होण्यापूर्वीचे चित्रपट. ज्या चित्रपटांमध्ये तो व्हिलनबरोबर किंवा गुंडांबरोबर मारामारी करत असताना बऱयाचदा ते गुंड त्याला मारत होते. तो खाली पडत होता, त्यालाही लागत होता, तोही रक्तबंबाळ होत होता, पण सुपरस्टार झाल्यानंतर मात्र समोर पाच माणसं असू देत की पन्नास माणसं असू देत, त्यापैकी कोणीही त्याला हात लावू शकत नाही. तो मात्र सगळ्यांना दणादण मारतो.

गेल्या दहा वर्षांत आलेल्या रजनीकांतचे चित्रपट पाहताना  एक सूत्र माझ्या लक्षात आले आहे. चित्रपट चालू होतो आणि पडद्यावर कोणीतरी धावत असतात. तेवढय़ात एक हात दिसतो. त्या हातात बंदूक असते. गोळी झाडली जाते. तो धावणारा माणूस ठार होतो. पुन्हा कोणीतरी कारमधून चाललेला असतो त्याला गोळी लागते. कोणाला तरी गोळी लागते आणि तो चौथ्या-पाचव्या मजल्यावरून खाली कोसळत येतो. पहिल्या तीनöचार मिनिटांतच आठ खून होतात आणि त्यानंतर त्यांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात येतं की, आदित्य नाव असलेला कमिशनर म्हणजे  रजनीकांत हा सगळ्यांना अशा प्रकारे ठार करत आहे. तो का ठार करतोय याचं कारण हे गुलदस्त्यात असतं, पण रजनीकांत ठार करत असल्यामुळे ते गुंडच असणार याची प्रेक्षकांना खात्री असते आणि तसं गृहीत धरलेलं असतं. चित्रपट सुरू होण्याच्या काही क्षणांतच रजनीकांतची दहशत, त्याचा दरारा त्या विशिष्ट शहरातल्या गुंड आणि स्मगलरमध्ये कसा आहे हे अशा दृश्यांतून सादर केले जाते. अर्थात रजनीकांतचा दरारा हा त्याच्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर तयार झालेला आहेच. तो पुन्हा दाखवण्याची खरं तर तशी गरज नाही, पण दिग्दर्शकाला अशा प्रकारे रजनीकांतला समोर आणण्याची एक आवड किंवा सवय झालेली आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला फक्त रजनीकांतचा हात दिसतो  त्यानंतर कुठल्या तरी एका ठिकाणी एका मोठय़ा गोडाऊनमध्ये सर्व गुंड जमा झालेले आहेत आणि तिथे त्या मोठय़ा गुंडाचा हॅपी बर्थडे साजरा होत आहे. दरवाजे, खिडक्या सगळं बंद केलेलं आहे. तो येणार याच्या धास्तीने गुंड इतके घाबरलेले आहेत की, ते टाळ्या वाजवायचेसुद्धा विसरलेले आहेत. आता आपल्याला रजनीकांतची फक्त सावली दिसते. त्यानंतर रजनीकांत छताच्या पत्र्यावरून तो चालत असताना त्याच्या पावलाचे ठसे खालून गुंडांना दिसतात. म्हणजेच त्याचं चालणं हे किती प्रचंड पावरफुल आहे अशी इमेज बनवण्याचं काम केलं जातं. खालून सगळे त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्यांचा वर्षाव करतात. अर्थात त्याला एकही गोळी लागत नाही. आता बारीक जाळीमधून अस्पष्ट, अस्पष्ट असा रजनीकांत दिसू लागतो आणि अचानक तो कुठून खाली येतो तेही कळत नाही, पण तो खाली आल्यानंतर चार-पाच गुंड हवेत उडालेले असतात आणि मग तो शंभर-दोनशे लोकांच्या गटांमध्ये ज्या सर्वांकडे पिस्तुले आहेत, हा मात्र हातामध्ये केवळ तलवार घेऊन त्यांच्यावर सपासप वार करत निघतो. कोणाचा हात, कोणाची बोटं, कोणाची छाती, कोणाचं काय, तो सहजपणे कापत चाललेला आहे. सगळे तिथे खाली पडतात आणि मग पहिल्यांदा आपल्याला रजनीकांतचा तो विशिष्ट पद्धतीने ओठ थोडेसे वाकडे करून हसणारा चेहरा दिसतो. त्या चेहऱयामध्ये एक गर्व आहे, एक अटिटय़ूड आहे. तुमच्या सगळ्यांची मी कशी वाट लावू शकतो ही भावना आहे. कोणतेही लॉजिक न लावता चित्रपटाचा केवळ आनंद घेण्यासाठी रजनीकांतचे चित्रपट पहायचे असतात हे मला हळूहळू समजू लागलं.

रजनीकांत चित्रपटामध्ये पोलीस कमिशनर असला, एखाद्या कॉलेजचा प्राचार्य असला, एखाद्या कंपनीचा डायरेक्टर असला किंवा एखाद्या कॉलेजचा वार्डन असला तरी तो सीएम, पीएम, जीएम, एसीपी, डीसीपी यांना कोणालाही घाबरत नाही. खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये असा नायक आधीपासूनच ठरलेला आहे की, जो कोणालाही घाबरतच नाही. तो पदावर असू द्या किंवा पदावर नसू द्या. रजनीकांतच्या चित्रपटात हे आपल्याला पहायला मिळतं. म्हणजे अगदी ज्या गोष्टींचा आपण विचारही करू शकत नाही, म्हणजे कल्पनेतही आपण ज्याची कल्पना करू शकत नाही अशा गोष्टी रजनीकांतच्या चित्रपटांमध्ये आपल्याला पहायला मिळतात.

कोणताही मेकअप न करता अनेक सार्वजनिक कार्पामात अगदी सहजतेने वावरताना आपण रजनीकांतला पाहतो. त्याचा काळासावळा चेहरा, टक्कल पडलेले आहे. टकलावर काही काळे डाग आहेत. त्याची पांढरी दाढी आहे, पांढरी लुंगी आहे, पण तरीही तो लोकांना आवडतो. लाखो लोक त्याचे

फॅन्स आहेत. आपल्या फॅन्सवर त्याचा प्रचंड विश्वास आहे. जणू फॅन्सचे आणि त्याचे एक अदृश्य नाते आहे. म्हणूनच त्याला आपल्या कोणत्याही चित्रपटाचे प्रमोशन करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करतात. निर्मात्याने गुंतवलेले पैसे त्याला खात्रीने परत मिळतात. ‘जेलर’ चित्रपट लोकांना पाहता यावा म्हणून ऑफिसेस, कार्यालय, कंपन्या यांना सुट्टी देण्यात आली आहे, जेणेकरून लोकांनी हा चित्रपट पहावा. लोकांची आवड ही अशी जपली जाते. रजनीकांतची अशी ाsढझ आहे. ‘जेलर’ चित्रपटातील ‘कवाला’ नावाचे गाणे प्रचंड गाजत आहे. त्या गाण्यामध्ये नाचणारी तमन्ना आणि तिच्या बाजूला उभा असलेला रजनीकांत. तो तिच्याइतका वेगाने नाचत नसला तरी मध्येच एकदा तो आपल्या जॅकेटमधून गॉगल काढून पुन्हा त्याच स्टाईलने आपल्या डोळ्यांवर लावतो. ही गॉगल लावण्याची त्याची स्टाईल नृत्याच्या स्टेपमध्येही पाहायला लोकांना आवडते.

या वयातही न थरथरता एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या वेगाने तो हालचाली करतो, हाणामारी करतो. प्रेक्षकांच्या हृदयात असलेला रजनीकांतचा चेहरा म्हणजे पडद्यावर दिसणारा हसरा, डोक्यावर भरपूर केस असणारा रजनीकांत होय. त्याचे केस चालताना हवेमध्ये उडतात. तसा तो पडद्यावर अजूनही तरुण वाटतो. तो रजनीकांत जो सिगारेट बोटाने ओठात न ठेवता सिगारेट खालूनच फेकून ओठांत पकडतो. हातातील चावी बोटाने गरागरा फिरवतो. गॉगल विशिष्ट स्टाईलने घालतो. खांद्यावर असलेले उपरणे गोलाकार फिरवून पुन्हा खांद्यावर टाकतो. गळ्यात असलेले मफलर हवेत उडवून पुन्हा गळ्यात घेतो.

रजनीकांतच्या चित्रपटाची कथा म्हणजे त्याच्या भोवती फिरणारी.  त्याचे हसणे, त्याच्या हसण्याचे अनेक प्रकार आपल्याला पडद्यावर तो दाखवतो. त्याचे कपटी हसणे, खलनायकी हसणे, गमतीने हसणे, चिडवताना हसणे, खुन्नस देताना हसणे, पटवून देताना हसणे, एखाद्याला फसवताना हसणे, सगळेच हसणे विलक्षण वेगवेगळे असते. एका चित्रपटात तो इडलीचा गोळा बनवतो आणि ती इडली तो फेकून मारल्यानंतरसुद्धा तो दगड लागल्यासारखा समोरचा माणूस खाली पडतो. तो काहीही करू शकतो. त्याचा एखादा डायलॉग असा असू शकतो… मैं शरीफ हू पर जादा शरीफ नही.

गेल्या दहा-बारा वर्षांतील चित्रपटांमध्ये त्याला एकदमच तरुण दाखवत नाहीत, तर बऱयाच वेळा त्याला दोन मोठय़ा मुली वा दोन मोठी मुलं असतात. फक्त त्याला बायको मात्र नसते आणि मग तो इतर चित्रपट असणाऱया नायिकांनाच आपल्या शैलीने पटवताना दाखवले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नायकाचे एक वय झाल्यानंतर त्याला चरित्र नायकाची भूमिका स्वीकारावी लागते. याला अमिताभ बच्चनसारखा मिलेनियम स्टारसुद्धा अपवाद नाही. त्यालाही एका विशिष्ट वयानंतर नायक म्हणून लोकांनी स्वीकारले नाही, पण रजनीकांत मात्र याला अपवाद आहे. आज वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षीसुद्धा त्याला तेच प्रेम त्याच्या फॅन्सकडून मिळत आहे. एक काळ नायक होण्यासाठी कसं दिसायला हवं याचे काही नियम ठरलेले होते. तसं पाहिलं तर रजनीकांत त्या कोणत्या नियमांत बसत नाही आणि नव्हता, पण तरीही आपल्या अभिनय कौशल्याने, स्टाईलने तो प्रेक्षकांना आजही भुरळ पाडत आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)