दीर्घायु भव – केसांतील ‘चाई’वर उपाय

>> वैद्य सत्यव्रत नानल

 लहान मुलांपासून ते मोठय़ा वयाच्या माणसांपर्यंत अनेक लोकांच्या डोक्यावर काही भागात गोल किंवा वेडय़ावाकडय़ा आकारांच्या भागातील केस गळून जातात. काही वेळा ते प्रमाण कमी असते आणि थांबते, परंतु काही वेळेस मात्र हे प्रमाण एवढे वाढते की, हळूहळू संपूर्ण अंगावरील केस गळून जाऊ शकतात. जसे दाढी, मिशीचे केस जाणे, भुवया जाणे, अंगावरील बारीक लव नाहीशी होणे. संपूर्ण डोक्यावरील केस जाणे. या प्रकारास आयुर्वेदात ‘इंद्रालुप्त’ असे नाव आहे. मराठीमध्ये यास ‘चाई पडणे’ (एलोपेशिया ) म्हणतात. आयुर्वेदात यावर उत्तमातील उत्तम उपाय आहेत, परंतु उशीर झाल्यास एकदा त्या भागातील केसांची मुळे मेली किंवा गळून गेली तर मात्र काही केल्या नवीन केस येणे अवघड होऊन बसते. त्यामुळे असे प्रकार सुरू झालेले लक्षात आल्यावर लगेच वैद्यकीय सल्ला घेणे हे सर्वात उत्तम.

चाईमधे करावयाच्या फायदेशीर गोष्टी

  •  मीठ, खारवलेले पदार्थ, खूप जास्त आंबट पदार्थ, टोकाचे तिखटजाळ पदार्थ खाऊ नयेत.
  •  सर्दी, कफ होण्याची सवय असणाऱयांनी थंड पदार्थ, थंड पाणी/पेय, आंबट, तळलेले पदार्थ, तळलेल्या मिठाया, केळी, सीताफळ, पेरू खाणे टाळावे.
  •  वारंवार सर्दी, खोकला होत असेल तर त्वरित उपचार घ्यावेत आणि सवय मोडावी.
  •  डोक्यावर केसांच्या मुळाशी रोज किंवा किमान आठवडय़ातून 2 ते 3 वेळ खोबरेल तेल किंवा केसांसाठी उपयोगी वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल लावून किमान तीन ते सहा तासपर्यंत ते तेल डोक्यावर ठेवून मग धुवावेत.
  •  खूप गरम पाण्याने आंघोळ करणे सर्वांनी टाळावे, त्याने केसांची मुळे कमजोर होतात.
  •  केस दर 3 ते 4 आठवडय़ांनी कापावेत. थोडे बारीक ठेवावेत, ज्याने केसांमध्ये हवा खेळती राहील.
  •  केसांमध्ये काsंडा असेल तर ते आयुर्वेदानुसार अपचनाचे लक्षण आहे. त्वरित उपचार करावेत. घरगुती उपचार म्हणून दही लावून 10 मिनिटांनी केस धुवावेत.
  •  केस धुताना कोरफड रस आणि लिंबू एकत्र करून ते केसांच्या मुळाशी चोळून 10 मिनिटांनी कोमट पाण्याने (गरम किंवा थंड नव्हे) किंवा साध्या पाण्याऐवजी कडुलिंब काढय़ाने धुवावेत. एक बादली कोमट पाण्यात एक लिटर काढा तरी किमान मिसळून वापरावे.
  •  गरम पाणी आणि थंड पाणी असे एकामागोमाग एक वापरून आंघोळ करणे, केस धुणे टाळावे. याने केस गळतात.
  •  आपल्या घरात बोअरवेल वगैरेचे खूप क्षारयुक्त पाणी येत असेल तर त्याने केसांचे त्रास वाढतात. अशा वेळी पाण्यात तुरटी फिरवून 10 मिनिटांनी मग ते पाणी वापरावे.
  •  ज्यांना भरपूर घाम येतो त्यांनी घाम केसात सुकू देऊ नये. सतत पुसून काढावे.

पंचकर्मातील उपाय

आपल्या वैद्यांकडे जाऊन चाई पडलेल्या ठिकाणी जळवा लावता येतात. कफ, सर्दी, अॅलर्जी असे त्रास असणाऱयांनी विधिवत स्नेहपान, स्वेदन घेऊन वमन कर्म करावे आणि चाईसाठी उपचार त्यासोबत करावेत.

ज्या भागांवर चाई पडली तिथे…  

 चाई पडलेल्या भागात झीरो नंबरचा पॉलिश पेपर घेऊन हलके घासावे किंवा लाकडी नेल फाईल घेऊन त्याने घासावे. (जखम होणार नाही असे पहावे.) त्यानंतर कडुलिंब पानांची गरम पाण्यात ताजी चटणी करून त्यात निंब तेल आणि करंज तेल मिसळावे. हे गरम मिश्रण त्या भागावर अर्धा ते एक तास ठेवावे आणि नंतर काढून त्या भागावर करंज तेलाचे काही थेंब हळूहळू जिरवावेत. त्यानंतर तो भाग स्वच्छ धुऊन कोरडा करावा.

 सीताफळाच्या पानांची आणि कडुनिंब पानांची चटणी करून त्याचा रस काढावा. या रसाने त्या भागावर मालिश करावे. रस तिथे जिरवावा. एक तास थांबून नंतर केस धुवावेत. (हा रस डोळ्यात जाऊ देऊ नये. पिऊही नये.)  वरील उपचार सतत 7 ते 21 दिवस करावेत.

[email protected]