प्रासंगिक – श्रावण मास संभ्रमाचे निराकरण

>> वृषाली पंढरी

सध्या सोशल मीडिया आणि विविध  वर्तमानपत्रांतूनही यंदा दोन श्रावण मास आहेत का? यावर चर्चा सुरू आहे. दरवर्षी येणाऱ्या श्रावण महिन्याचे सणवारदृष्टय़ा एक वेगळे महत्त्व आहेच, पण पुरुषोत्तम मास असलेल्या दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे धार्मिक आणि परंपरांच्या दृष्टीने वेगळे महत्त्व आहे. श्रावणी (महिनाभर एकभुक्त राहणे) करणारे आणि श्रावणी सोमवारी उपवास करणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. अशा लोकांसाठी यावेळी श्रावण महिना दोन महिने आहे का? सोमवाराचे आठ सोमवार उपवास करायचे का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. अनेक लोक सत्यनारायण पूजा, नवनाथ पारायण श्रावणात करतात. अशा सगळ्यांना श्रावण महिना दोन महिने आहे का? या प्रश्नाने गोंधळात टाकले आहे. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे, ते म्हणजे श्रावण महिना दरवर्षीप्रमाणे एकच महिना आहे. विविध कॅलेंडरवर अधिक श्रावण, निज श्रावण असं लिहिलेलं असल्यामुळे श्रावण महिन्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच सोशल मीडियावरील तथाकथित तज्ञांनी मते, फॉरवर्डेड मेसेजेसमुळे या संभ्रमात भरच पडली आहे. काहींनी तर यंदाच्या वर्षी 18 जुलैपासून श्रावण मास  सुरू  झाला असून अधिक महिन्यामुळे श्रावण मास 59 दिवसांचा असणार आहे असे जाहीरच करून टाकले.

हिंदू पंचांग गणना  चांद्र महिन्यानुसार होते. इंग्रजी कॅलेंडर आणि आपले ऋतुचक्र हे मात्र सौर महिन्याशी जोडलेले आहे. चांद्र महिना 29 दिवसांचा असतो, तर सौर महिना 30,31 दिवसांचा असतो. यामुळे प्रतिवर्षी चांद्र आणि सौर वर्षाच्या एकूण दिवसांमध्ये 13 ते 14 दिवसांचा फरक पडतो. हिंदू पंचांगामध्ये दर तीन वर्षांनी अधिक मासाची योजना करण्यात आली आहे. मुस्लिम कालगणनाही चांद्र महिन्यानुसारच आहे. त्यामुळे ऋतुचक्रांशी हिंदूंच्या सणांचा मेळ राहतो. मुस्लिम कालगणनेत ही योजना नाही. त्यामुळे मुस्लिम  सण विशिष्ट ऋतूत येत नाहीत

आता आपण यंदाच्या  संभ्रम निर्माण झालेल्या अधिक मासाबद्दल चर्चा करू या.

पुण्यातील प्रसिद्ध योगाचार्य आणि समुपदेशक गजानन शंकर योग यांनी यंदाच्या श्रावण मास व अधिक मास या संभ्रमासंदर्भात पुढीलप्रमाणे सविस्तर मतप्रदर्शन केले आहे.

उत्तर हिंदुस्थानातील पौरोहित्य करणाऱ्या मंडळींनी आठ सोमवार करा,दोन महिने श्रावण महिना आहे, असे मत प्रदर्शित केलं आहे. त्यांच्या व आपल्याकडील कालगणनेत फरक आहे. त्या भागांत पौर्णिमा ते पौर्णिमा असा महिना असतो, तर आपल्याकडे अमावस्या ते अमावस्या महिना असतो. 17 जुलै 2023 ला मध्यरात्री अमावस्या संपून 18 जुलै 2023 पासून अधिक महिना सुरू झाला आहे, तर 16 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजून 7 मिनिटांनी अधिक महिना संपून नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिना सुरू होणार आहे. अधिक श्रावण व निज श्रावण यामुळे संभ्रम झाला असला तरी त्या महिन्यांची विभागणी वरीलप्रमाणे आहे. थोडक्यात,18 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 अधिक मास व 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 हा श्रावण मास आहे. त्यामुळे अधिक महिन्यात करावयाच्या रुढी 18 जुलै ते 15 ऑगस्ट यादरम्यान पाळायच्या आहेत. तसेच श्रावणातील व्रतवैकल्ये, सोमवार व इतर उपवास, पारायण वाचन हे सगळं 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 यादरम्यान करायचे आहे. इतर कोणत्याही माहितीनुसार नव्हे, तर वरीलप्रमाणे श्रावण महिन्याची व्रतवैकल्ये, उपवास करायचे आहेत.

हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून संपूर्ण श्रावण मासामध्ये महादेवाची पूजा आणि व्रतवैकल्ये केली जातात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. यावेळी दिवसभर शक्यतो केवळ फलाहार केला जातो आणि रात्री जेवण करून उपवास सोडला जातो. तसंच श्रावणामध्ये मांसाहारदेखील केला जात नाही. खरं तर यामागे धार्मिक कारणं असली तरी या उपवासामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील लपलेली आहेत. या काळात पचनशक्ती मंद झालेली असल्याने सामिष आहार, कांदा, लसूण वर्ज्य करून उपवास केल्याने पचनेंद्रियांना विश्रांती मिळते अशी शास्त्रीय कारणे आहेत.

पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मतानुसारसुद्धा यंदाचा श्रावण 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे श्रावणातील सर्व सण आणि व्रतवैकल्ये अधिक श्रावण महिन्यात न करता निज श्रावण (18 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर) या काळातच करावयाची आहेत, असेही ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनीही म्हटले आहे. वरील विश्लेषण वाचल्यावर दोन दोन की एक श्रावण? यासंदर्भातील संभ्रम दूर व्हायला हरकत नसावी.