Lok Sabha Election 2024 : सुप्रीम कोर्टाचा ईव्हीएमच्या बाजूने कौल

ईव्हीएमला आव्हान देणाऱया सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने फेटाळल्या. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती अमान्य करत खंडपीठाने ईव्हीएमच्या बाजूने कौल दिला. ईव्हीएममध्ये होणारे मतदान आणि व्हीव्हीपॅटच्या पावत्या यांची 100 टक्के मोजणी करून पडताळणी केली जावी ही मागणीही न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेटाळली. त्याचवेळी व्हीव्हीपॅटमधील पावत्या मतदानानंतर 45 दिवस सुरक्षित ठेवण्याबाबत व उमेदवाराने तक्रार केल्यास ईव्हीएमची तपासणी करण्याबाबत खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिले. ईव्हीएमविरोधातील सर्व याचिकांवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती (पान 1 वरून) दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर एकत्रितपणे सुनावणी झाली. त्यावर आज खंडपीठाने निकाल दिला.

…तर चिन्ह लोडिंग युनिट्स सील करावीत

ईव्हीएममध्ये चिन्ह भरणा झाल्यावर ती प्रणाली यंत्रे उमेदवारांच्या सह्यांनिशी सीलबंद करून कंटेनरमध्ये ठेवावीत आणि निकाल जाहीर झाल्यावरही किमान 45 दिवसांसाठी ईव्हीएमसह स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात यावीत.

यंत्रणेवर अविश्वास दाखवणे योग्य नाही

थेट निवडणूक यंत्रणेवर किंवा व्यवस्थेवर अविश्वास दाखवणे योग्य नसल्याचे मत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सुनावणीदरम्यान व्यक्त केले. कोणत्याही यंत्रणेवर आंधळेपणाने अविश्वास ठेवला तर संशय निर्माण होतो. लोकशाही म्हणजे विश्वास आणि सुसंवाद राखणे असे ते म्हणाले.

व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीसाठी मशीन वापरू शकता का?

व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोग मशीनचाही वापर करू शकते का? तसेच निवडणूक आयोग निवडणूक चिन्हासह प्रत्येक पक्षाला एक बारकोडही देऊ शकतो का? याची चाचपणी करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले.

पराभूत उमेदवाराला काय करता येईल?

निवडणूक निकालांमध्ये दुसरे आणि तिसरे स्थान मिळविणाऱया उमेदवारांना सात दिवसांत निवडणूक आयोगाकडे योग्य ती फी भरून लेखी विनंती केल्यावर, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच टक्के ईव्हीएममध्ये बसवलेल्या मायक्रोकंट्रोलर चिपची उत्पादक कंपन्यांच्या इंजिनीयरकडून तपासणी करता येईल.

ईव्हीएममधील मते आणि व्हीव्हीपॅट स्लिप पडताळणीसाठी येणारा खर्च उमेदवाराला करावा लागेल.

पडताळणीअंती ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाल्यास उमेदवाराला सर्व खर्च परत दिला जाईल, असे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी नमूद केले.

व्हीव्हीपॅटमधील पावत्या 45 दिवस सुरक्षित ठेवा

ईव्हीएममधील मते आणि व्हीव्हीपॅटमधील स्लीपची 100 टक्के पडताळणी केली जाणार नाही. मात्र मतमोजणीनंतर व्हीव्हीपॅटमधील पावत्या 45 दिवस सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी. या पावत्या उमेदवारांच्या आणि प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने सील करून स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवाव्यात, असे खंडपीठाने नमूद केले.

नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन कुऱहाडीने फोडले

नांदेडमध्ये बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील शाळेत आज मतदान केंद्रामध्ये घुसून भय्यासाहेब एडके या तरुणाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची कुऱहाडीने तोडफोड केली. त्याने छोटी कुऱहाड लपवून आणली होती. मतदान केंद्रात शिरल्यानंतर त्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनवर एकामागोमाग एक कुऱहाडीचे घाव घातले. त्यामुळे मतदार, निवडणूक कर्मचारी, अधिकारी घाबरले. काही मतदारांनी तिथून पळही काढला. दरम्यान, एम.ए. असूनही नोकरी मिळत नसल्याने राग व्यक्त केल्याचे भय्यासाहेबने सांगितले.