ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक जनता पुसणारच;राजन विचारे यांचा जबरदस्त विश्वास

ठाणे शहराची ओळख निष्ठावंतांचे शहर, शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना अशी होती. मात्र मध्यंतरी मिंधे गटाने या शहराला गद्दारीचा कलंक लावला. लोकसभा निवडणुकीत जनता हा ठाणे शहरावर असलेला गद्दारीचा कलंक पुसणारच आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी व्यक्त केला.

राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आज घोडबंदर येथील हायलॅण्ड पार्क ढोकाळी येथून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते अनिश गाढवे, संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सहसमन्वयक राम काळे, विभागप्रमुख वासुदेव भोईर, अरविंद भोईर, साईनाथ पाटील, मयूर पैलकर, प्रतीक राणे, जिवाजी कदम, पप्पू आठवाल, किरण जाधव, राज वर्मा, राजेश्री सुर्वे, सुनंदा देशपांडे, वैशाली शिंदे, आरती खळे, पूजा भोसले, विद्या कदम, ज्योती दुग्गल, उषा बोरुडे, गीता चव्हाण, कविता नार्वेकर, विक्रांत चव्हाण, रसुहास देसाई, विक्रम खामकर, महेश म्हात्रे, चंद्रशेखर पवार आदी सहभागी झाले होते.

अभ्यास कमी असल्याने वायफळ बडबड
विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना चांगलाच घाम फुटलेला आहे. त्यामुळेच वायफळ भाषण करण्यात ते व्यस्त आहेत. मुळात लोकसभासारख्या निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत. मात्र त्यांचा अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड करत आहेत, असा आरोप राजन विचारे यांनी यावेळी केला.