खाऊगल्ली- गुढीपाडव्याला वेगळं गोडधोड

 

>> संजीव साबडे

नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा गोडवा अधिक वाढवायचा तर नेहमीपेक्षा या वेगळ्या गोडधोड प्रकारांनी ताट सजले पाहिजे. फार शोधाशोध न करताही असे वेगळे पदार्थ सणाचा गोडवा वाढवतात आणि जिव्हातृप्तीही होते.

चै त्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू नववर्ष. दोन दिवसांवर आलाय हा मोठा सण. हल्ली तो उत्सवासारखा साजरा होतो. ढोल-ताशे, हातात झेंडे, डोक्यावर फेटे, नऊवारी साडय़ा नेसलेल्या महिला, मोटरसायकलीच्या रांगा, मिरवणुका आणि घरी गोडधोड जेवण. यंदा काय गोड करावं वा विकत आणावं याची चर्चा सुरू झाली असेल. गेल्या वर्षी श्रीखंड झालं होतं, मग यंदा पुरणपोळी, बासुंदी करावी? पुरणपोळी तर होळीच्या निमित्ताने झाली होती. मग बासुंदीच, की खीर? की आणखी काही वेगळं करावं? की विकत आणावं? सुचत नाही ना? पण या ठरलेल्या व पारंपरिक व ठरलेल्या गोड पदार्थांपेक्षा काही हटके करायला काय हरकत आहे? जमलं तर घरीच करा किंवा विकत आणा.

आंब्याचा सीझन सुरू झाला की आम्रखंड होतं, आमरसही होतो. त्याऐवजी आंब्याचा रस घालून तांदळाची व शेवयाची खीर करायला काय हरकत आहे? आंबटगोड आवडत असेल तर बंगाली बनवतात तशी संत्र्याचा रस व छोटे तुकडे घालून खीर करा. नक्की आवडेल सर्वांना, किंवा मूगडाळीची गूळ आणि नारळाचं दूध व थोडे लहान तुकडे घालून दक्षिण हिंदुस्थानी खीर (परिपू पायसम) मस्त लागेल. काही वेगळं केल्याचा आपल्याला आणि वेगळं खायला मिळाल्याचा घरच्यांना आनंद. खीर व बासुंदी टाळायची असेल तर रबडी हा पर्याय उत्तम. आता रबडी मिळणं खूप सोपं आहे. जे घरी बासुंदी बनवतात, त्यांना रबडी बनवणं काही अवघड नाही. पण साधी मलाई रबडी बनवण्यापेक्षा सीताफळ, आंबा, स्ट्रॉबेरी, चिकू, सुका मेवा यांची रबडी बनवावी. शेवया घालूनही रबडी बनवली जाते. ती शिल्लक राहणं अवघडच, पण राहिली तर ती डीप फ्रीजमध्ये ठेवल्यास कुल्फीही खाता येईल. या रबडीत गुलाबजाम व रसगुल्ल्याचे छोटे तुकडे व थोडा रस घातला की, रबडीची चव व गोडवा खूप वाढेल.

बोरिवलीच्या कोरा केंद्राजवळील रबडीवाला, सांताक्रुझचा एम. जे. रबडीवाला, गिरगाव चौपाटीवरील कपूर, झवेरी बाजारातील अबू रबडी, वांद्रे येथील चार भुजा रबडी फालुदा, पंजाब अँड सिंध डेअरी, घाटकोपरमधील पुरुषोत्तम कंदोई दामोदर, किंग्ज सर्कलच्या गांधी मार्केटमधील श्रीनाथ रबडी, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील देसी स्वाद, मरीन लाइन्स, घाटकोपर, कांदिवली, बोरिवली येथील पारसी डेअरी फार्म या ठिकाणी मिळणारी रबडी अतिशय उत्तम दर्जाची, पण रबडी घरी करणं बरंच स्वस्त ठरतं.

गोडधोड म्हणून पुरणपोळीऐवजी खवापोळी हा प्रकारही चांगला. एकतर खवापोळी क्वचित केली जाते. इंडिया रूट्स ट्रेडिंग कंपनीमार्फत आठवले यांच्याकडील खवापोळी मागवता येईल. चितळे एक्स्प्रेसमध्येही खवापोळी मिळते. मात्र त्यासाठी आधी ऑर्डर द्यावी लागत असावी. ठाण्यात निअम यांच्याकडे खव्याची पोळी आणि खव्याचे अनेक प्रकार मिळतात. अर्थात ते ऑनलाइन मागवावे लागतात. मुंबईतील आणखीही काही मराठी रेस्टॉरंट व दुकानांत खवापोळ्या मिळतात. आंबा, फणस, खजूर, अननस, खजूर, चॉकलेटची चव व बिनसाखरेच्या पुरणपोळ्या ‘पुरणपोळी घर’मध्ये मिळतात.

सणासुदीला जिलबीही विकत आणतो. यंदा खवा जिलबी आणि जिलबी घेवरचा विचार करा. जे. जे. जिलबीकडील खवा जिलबी खूपच मस्त! मुंबईत 1947 साली जे. जे. हॉस्पिटलच्या परिसरात ही जिलबी मिळू लागली. ती लोकांना इतकी आवडली की, आता मुंबईत पाच-सात ठिकाणी ती मिळते. नेहमीच्या जिलबीपेक्षा हिचा रंग अधिक गडद असतो. अधिक तळल्यामुळे ती काळपट झाली की काय, अशी शंका येते, पण खव्यामुळे त्या जिलबीचा रंग असा दिसतो. ग्रांट रोड, जोगेश्वरी, मालाड, मीरा रोड, कुर्ला, मुंब्रा अशा बऱयाच ठिकाणी आता जे. जे. जिलबीची दुकानं आहेत. आता काही ब्रिजवासी मिठाईवाल्यांकडेही खवा जिलबी मिळते. ही जिलबी व रबडी एकत्र खाण्याचा आनंद म्हणजे स्वर्गीय सुख. जिलबी घेवर हा सिंधी पदार्थ गुढीपाडव्याला घरी आणता येईल. सिंधी घरात होळीला हमखास आणला व केला जाणारा हा पदार्थ मस्त लागतो आणि दिसतोही. सांताक्रुझ, घाटकोपर, ग्रांट रोड, पवई, दादर, मुलुंड, खार अशा मुंबईतील असंख्य ठिकाणी असलेला चंदू हलवाई, चेंबूर व खारमधील प्रसिद्ध झामा स्वीट तसंच खार पश्चिमेकडील सिंधू स्वीट, थारू स्वीट या व अनेक ठिकाणी जिलबी घेवर उत्तम मिळतो.

आणखी एक वेगळा प्रकार जो आपल्याला आवडतो, पण सणाला मिठाई म्हणून आपण ज्याचा विचार करत नाही, तो आहे खरवस. आता तो सर्वत्र मिळतो. ठाण्याच्या मल्हार सिनेमा भागात अतुल दीक्षित यांचा खरवस कारखाना आहे. तिथे 11 प्रकार व चवीचे खरवस मिळतात. लता मंगेशकर यांना तिथला खरवस खूप आवडायचा. मुंबईत तांबे, पणशीकर, आस्वाद, सप्रे अँड सन्स अशा असंख्य ठिकाणी उत्तम खरवस मिळतो. याखेरीज तुमच्या घराजवळही आणखी अनेक ठिकाणं असतील. फ्रीजमध्ये ठेवलेला थंड खरवस या उन्हाळ्यात सर्वांना जेवणानंतर नक्की आवडेल. लहान मुलांसाठी कॅरमल कस्टर्ड हा पर्याय आहे किंवा मस्त थंडगार रसमलाई.

नेहमीपेक्षा या वेगळ्या गोडधोड प्रकारांनी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा गोडवा अधिक वाढेल. मधुमेह असलेल्यांसाठी बिनसाखरेचा गोड पदार्थ शोधा. तोही मिळेल नक्की.

[email protected]