बहुगुणी पण दुर्लक्षित

अभय मिरजकर / निसर्गमैत्र

अनेक उपयोग असणारा आणि महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा पळस सध्या दुर्लक्षित होत आहे. एकेकाळी हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून देणारा पळस आधुनिकतेच्या नावाखाली प्लास्टिकच्या वापरामुळे दुर्लक्षितच झाला आहे. एवढेच नाही तर तो दुर्मिळही होत आहे.

त्रिदल प्रकारातला हा वृक्ष त्यामुळेच ‘कुठेही जा पळसाला पाने तीनच’ ही प्रसिद्ध म्हण प्रचलित आहे. हिंदुधर्मात पळसाला बरेच महत्त्व आहे. पानाच्या तीन दलांना ब्रह्मा (डाव्या बाजूचे), विष्णू (मधले) व महेश (उजव्या बाजूकडील) अशी नावे असून त्यांची चातुर्मासात पूजा करण्याचे सांगितले आहे. लहान फांद्यांच्या सुक्या तुकडय़ांना ‘समिधा’ म्हणतात व त्या होमहवनाकरिता प्राचीन काळापासून वापरात आहेत. देवीच्या पूजेसाठी पळस फुलांचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

पळसाची पाने, फुले, खोड व साल अशा सर्व भागांचा वापर केला जातो. गर्द रंगाची फुले सर्वांना आकर्षित करून घेतात. भडक रंगामुळे आकर्षित झालेले अनेक पक्षी त्या फुलातील मध लुटण्याकरिता झाडावर गर्दी करतात. त्यामुळे परागकणास दुसऱया फुलात नेण्यास सहाय्य होते. मौंजीबंधनात मुंडणानंतर पळसाचे पान मुंजा मुलास खाण्यास देतात व सोडमुंजीत पळसाची लहान काठी (दंड) त्याच्या हातात देतात.

सुक्या फुलांपासून पिवळा रंग मिळतो. फुले उकळून किंवा थंड पाण्यात भिजत ठेवून रंग काढता येतो. तो साडय़ा रंगविण्यास वापरतात. तुरटी, चुना किंवा क्षार (अल्कली) मिसळून तो पक्का नारिंगी करतात. गुलाल व अबीर बनविण्यास तो उपयुक्त आहे. पूर्वी पळसाच्या फुलांपासून रंग तयार करण्यात येत होते. सध्या रंग तयार करण्याबद्दल अनेकांना माहितीही नाही. रंगपंचमीसाठी हा रंग वापरला जात असे. सालीच्या आतील भागातून धागे काढले जात होते. कागदनिर्मिती व गलबतांच्या भेगा बुजविण्यास या धाग्यांचा उपयोग केला जात होता.

पळसाच्या पानांचे द्रोण आणि पत्रावळी तयार केल्या जातात. पूर्वी प्रत्येक घरात हे काम सुरू असायचे. प्लास्टिकच्या वापरामुळे पत्रावळी आणि द्रोण तयार करणेच बंद झाले. अनेकांना सहजपणे रोजगार मिळवून देणारा हा व्यवसाय दुर्लक्षित झाला. पानांच्या बिडय़ा तयार करण्यासाठी यास्तव वापर होत होता.

पळसाचे आयुर्वेदिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पळसाची पाने आकुंचन करणारी आहेत. तसेच लघवी साफ करणारी व शक्तीवर्धक आहेत. अतिसार, कफक्षय, उदरवायू, शूळ (वेदना), रक्ती मूळव्याध व कृमी यांवर याचा काढा देतात. त्यांचा सौम्य काढा पडसे व खोकला यावर गुणकारी असतो. पानांचे गरम पोटीस गळवे, मुरूम, गुल्म, सूज इत्यादींवर बांधतात. खडीसाखरेबरोबर साल चघळली असता तहान भागते. फुलेही पानासारखीच औषधी असतात. पळसाच्या बिया कृमिनाशक आहेत. त्यांचा लेप नायटय़ावर लावतात व जखमेतील किडे मारण्यास तसेच दाहावर गुणकारी असतात. पळसाच्या बिया लिंबाच्या रसात कुटून लावल्यास मानेवरची खाज कमी होते. डिंक अतिसार व आमांश झालेल्या लहान मुलांना व नाजूक स्त्रियांना उपयुक्त असून आमाशयातून व मूत्राशयातून होणाऱया रक्तस्रावावरही देतात. नायटे, खरचटणे इत्यादींवर तो पाण्यात विरघळून लावतात.