सोहळा संस्कृती – दिवाळीचं वैभवलेणं

>>अरुणा सरनाईक

दिवाळीचा एक स्वतःचा असा गंध असतो, जो वातावरणात बऱयाच आधीपासून अस्तित्वात असतो. एखाद्या पहाटे उठून जरा बाहेर फेरफटका मारल्यास आपल्याला दिवाळी जवळ आल्याची चाहूल वातावरणातील गंधातून लागते, संदेश येतो. तो फक्त आपल्याला मेहसूस करता आला पाहिजे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे. सर्व लोक हा दिवस मोठय़ा श्रद्धेने, आत्मीयतेने यथाशक्ती खूप उत्साहाने साजरा करतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, तीव्र इच्छाशक्ती, चांगला उद्देश, मेहनत या तीन गोष्टी जितक्या जास्त प्रमाणात तुमच्याकडे असतील तितक्या प्रमाणात संपत्तीचा प्रवाह तुमच्याकडे वाहता राहील. देवी लक्ष्मी प्रसन्न राहील.

दिवाळी’ किंवा ‘दीपावली’ असा शब्दप्रयोग दिवाळी या सणासाठी केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांच्या ओळी. येथे ‘आवळी’ या शब्दाचा किंवा ओळी याचा अर्थ दिव्यांची आरास, ओळीने दिवे लावणे, प्रकाशांच्या माळा प्रज्वलित करणे. तो हा सण दिवाळी. प्रकाशाची, दिव्यांची विविधता रोषणाई या सणात दिसून येते. आश्विन महिन्यात हा सण येतो. या आश्विनाचे सारे वागणेच मनोवेधक असते. किंचित रेंगाळलेली उष्ण उन्हं, तर कुठे थंडीची सुरुवातीची कोवळी शीत लहर. नवरात्री संपल्यावर 15 दिवसांत हा सण येतो. देवीच्या अस्तित्वाने भरलेल्या या वातावरणात पुन्हा एक आदिमातेचे पूजन हे लक्ष्मीपूजन म्हणून केले जाते. सकाळच्या नव्हे, तर पहाटेच्या धूसर वातावरणात सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी काम करून (अभ्यंगस्नान) नरकचतुर्दशी साजरी केली जाते. पूर्वी या दिवसाला फार महत्त्व होतं. आमच्या लहानपणी नरकचतुर्दशीला जर सूर्योदयापूर्वी स्नान नाही झालं तर नरकात जाणं निश्चितच असायचं!  त्यासाठी डोळे चोळतच स्नान व्हायचं! चार दिवसांच्या या सणाची सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते. गायवासरूची पूजा या दिवशी केली जाते. प्रत्येक सणामागे निसर्गाची पूजाही केली जाते. निसर्गाचा प्रत्येक पूजेत अग्रमान असतोच असतो. दीपपूजा ही या सणांमधील महत्त्वाची पूजा आहे.

दिवाळीतील लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे. सर्व लोक हा दिवस मोठय़ा श्रद्धेने, आत्मीयतेने यथाशक्ती खूप उत्साहाने साजरा करतात. गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो. लक्ष्मी हेदेखील आदिशक्तीचेच ऐश्वर्यसंपन्न रूप आहे.

श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन आपल्याला आपल्या प्राचीन अशा ऋग्वेद ग्रंथात होते. लक्ष्मीदेवीला प्रिय असलेल्या श्रीसूक्ताचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. यामध्ये तिला श्रीदेवी या नावाने संबोधिले आहे. श्री म्हणजेच लक्ष्मी होय. याहीव्यतिरिक्त श्रीसूक्तात तिच्या विविध नावांनी आवाहन केलेले आहे. देवीदेवतांच्या अनेक सूक्तांमध्ये श्रीचा अर्थ संपन्नता, समृद्धी, वैभव, पतिव्रता असा दिलेला आहे. समुद्रमंथनातून देवी प्रगटली, तिने श्रीविष्णूला आपला पती म्हणून स्वीकारले अशी तिच्या जन्माची कथा आहे. याशिवाय तिने पृथ्वीवर स्वतंत्र असे विविध सात अवतार घेतलेले आहेत. मानवी अवताराशिवाय अश्वीस्वरूपातील अवतार, नदीरूपातील अवतार, वृक्षावतार इत्यादी. असंही म्हणता येईल की, देवीला प्रिय असलेल्या कोणत्या ना कोणत्या रूपात देवीचे अस्तित्व आहेच. ‘या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिताः’ असे देवी सूक्तात मानले जाते. आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते तशी देवी आपल्या भक्तांची काळजी घेते. तिचे वास्तव्य आपल्या घरातही आहे. आपण ज्या रूपात तिचे स्मरण करतो त्या स्वरूपात ती आपल्यावर कृपा करते. तिचे जन्मस्थान सागर म्हणजे समुद्र आहे. तिला सागरातील सर्वच वस्तू शंख, कवडय़ा, कमळ प्रिय आहे. याशिवाय बिल्वपत्र, द्विधारी लिंबू, डाळिंब, चक्र नि वीणा, त्रिशूल, धनाची तिजोरी, जपमाळ, अमृतघट याही वस्तू प्रिय आहेत. कवडी ही संपत्तीचं, समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पूर्वीच्या काळी  क्रयविक्रीसाठी कवडीचा उपयोग केला जात असे. दिवाळीच्या, लक्ष्मीपूजनाच्या रात्री चांदीची नाणी, चलनातील पैसे यांच्यासोबत कवडय़ांचीदेखील पूजा केली जात असे. विशेष धनप्राप्तीसाठी कवडय़ांना केशर किंवा हळदीच्या पाण्याने रंगवून एका पिवळ्या वस्त्र्ाात बांधून घरात पूजेच्या ठिकाणी किंवा घरातील तिजोरीत ठेवले जाते. पूर्वीच्या काळी राजेमहाराजे कवडय़ांची माळ गळ्यात घालीत असत. देवीच्या गळ्यातही कवडय़ांची माळ घालतात. नवस वगैरे काही असेल तर कवडय़ांनी परडी भरतात. काही ठिकाणी कवडय़ांना देवीस्वरूप मानले जाते. हे जरी खरं असले तरी महत्त्वाची गोष्ट अशी की, तीव्र इच्छाशक्ती, चांगला उद्देश, मेहनत या तीन गोष्टी जितक्या जास्त प्रमाणात तुमच्याकडे असतील तितक्या प्रमाणात संपत्तीचा प्रवाह तुमच्याकडे वाहता राहील. देवी लक्ष्मी प्रसन्न राहील.

दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाशी बऱयाच कथा निगडित आहेत. समुद्रमंथनातून देवी प्रगट झाल्यावर सर्वप्रथम तिचे पूजन श्रीविष्णूंनीं वैपुंठात केले. नंतर ब्रह्मदेवांनी, नंतर गंधर्व आणि नागांनी पाताळात तिची पूजा केली. काही काळानंतर त्रैलोक्यात तिचे पूजन होऊ लागले. देवी नाना रूपांनी ओळखली जाऊन पुजली जाऊ लागली. वैपुंठात महालक्ष्मी, स्वर्गात स्वर्गलक्ष्मी, पाताळात नागलक्ष्मी, राजप्रसादात राजलक्ष्मी तर गृहस्थाघरी गृहलक्ष्मी, गाईत ती सुरभी झाली, यज्ञात दक्षिणा क्षीरसागर म्हणजे समुद्राची कन्या झाली. कमला, श्रीरूपा, चंद्राची शोभा बनली. ही सर्व देवीची रूपं मनभावन आणि मनोहारी आहेत. मात्र ती भोळी नाही. ती प्रयत्नशील, उद्योगशील माणसाला प्रसन्न होते. ती स्वयं प्रयत्नरूपी आणि उद्योगरूपी आहे. लक्ष्मीप्राप्तीने म्हणजे संपन्नता आली तरी माणसानं उन्मत्त होऊ नये. कारण उन्मत्ततेत अधःपात असतो. विनम्रतेत उत्कर्ष, वाढ असते हे आपल्या संस्कृतीनं वारंवार सांगितले आहे. वेळोवेळी निरनिराळी उदाहरणं देऊन, कधी कथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचविलेलं आहे. त्याचप्रमाणे जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास असतो. आपल्याकडे घराची, अंगणाची स्वच्छता केरसुणीने केली जाते. म्हणूनच लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा केली जाते. ही पूजा तिन्हीसांजेला केली जाते. सर्व घर-अंगण तेलदिव्यांनी, विजेच्या माळांनी लखलखीत केलं जातं. जणू देवीच्या आगमनासाठीचा मार्ग प्रशस्त केला जातो.

दिवाळीचा एक स्वतःचा असा गंध असतो, जो वातावरणात बऱयाच आधीपासून अस्तित्वात असतो. एखाद्या पहाटे उठून जरा बाहेर फेरफटका मारल्यास आपल्याला दिवाळी जवळ आल्याची चाहूल वातावरणातील गंधातून लागते, संदेश येतो. तो फक्त आपल्याला मेहसूस करता आला पाहिजे. त्या हवेचा, वातावरणाचा आल्हाददायक, निरागस, निर्भेळ आनंद आपल्या जिवलगांसोबत वाटून घ्या. मग लक्षात येईल की, फक्त आपलीच दिवाळी सुरू होत नाही तर  निसर्गातही दिवाळी सुरू झालेली आहे. रस्तोरस्ती झाडांच्या पायथ्याशी पानाफुलांच्या रांगोळ्या घातलेल्या असतात. ती त्यांची स्वतःची अशी लक्ष्मीपूजा असते. हो ना? दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!