अंदर रहू या बाहर, माझं आयुष्य राष्ट्राला समर्पित! केजरीवालांचे हुकूमशाहीविरोधात लढय़ाचे ऐलान

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोदी सरकारने ‘ईडी’च्या आडून सूडभावनेने दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर देशभरात सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी दिल्ली, मुंबई, पंजाब, हरयाणासह देशभरात मोदी सरकारचा निषेध करीत तीव्र आंदोलन, रस्तारोको केले. दरम्यान, ‘ईडी’ने न्यायालयात हजर केले तेव्हा केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात लढय़ाचे ऐलान केले. ‘ मैं जेल के अंदर रहू, या बाहर, मेरा जीवन राष्ट्र को समर्पित है’, असे केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना ठणकावले.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात ईडीने काल गुरुवारी Arvind Kejriwal यांना रात्री उशिरा अटक केली. ही अटक राजकीय सुडापोटी केल्याचे स्पष्ट झाले. आज केजरीवाल यांना दुपारी 2 च्या सुमारास राऊस एव्हेन्यु न्यायालयात ईडीने हजर केले. न्यायालयात हजर करताना केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर कर नाही तर डर कशाला असा आत्मविश्वास दिसत होता.

अटक करण्याची गरज नव्हती – सिंघवी

ईडीकडे सर्वकाही आहे मग, केजरीवाल यांना अटक करण्याची काय गरज होती, असा सवाल केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. तसेच 80 टक्के लोकांनी केजरीवाल यांचे नाव घेतले नाही. ते कधी भेटले हेदेखील सांगितले नाही. याकडेही सिंघवी यांनी लक्ष वेधले. दरम्यान, ट्रायल कोर्टातील रिमांडची प्रक्रीया सर्वेच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीशी क्लॅश होत आहे. त्यामुळे त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी द्यावी. आम्ही आधी ट्रायल कोर्टात रिमांडची कारवाई लढवू आणि त्यानंतर दुसरी याचिका घेऊन सर्वेच्च न्यायालयात येवू असे सिंघवी म्हणाले.

26 मार्चला पंतप्रधान कार्यालयाला घेराव

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ होळी खेळणार नाही, अशी घोषणा आपने केली आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ 26 मार्चला पंतप्रधान कार्यालयाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे दिल्ली संयोजक गोपाल राय यांनी आज दिली. शनिवारी सकाळी 10 वाजता आपचे सर्व नगरसेवक, आमदार, खासदार, कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे सर्व नेते शहीदी पार्क येथे एकत्र येऊन मोदी सरकारविरोधात निदर्शने करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मोदींना सत्तेचा अहंकार – सुनीता केजरीवाल

मोदीजींनी तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला अटक करून सत्तेचा अहंकार दाखवून दिला आहे. ते प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कारवाई म्हणजे दिल्लीच्या जनतेशी केलेली प्रातारणा आहे. दिल्लीच्या जनतेसाठी त्यांचे मुख्यमंत्री कायम सोबत राहिले. ते तुरुंगात असो किंवा बाहेर असो, त्यांनी स्वत:चे आयुष्य देश आणि मातृभूमीपासाठी समर्पित केले. जनतेलाही हे माहीत आहे. जय हिंद, अशी पोस्ट अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी एक्सवर केली आहे.

इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाकडे तक्रार

केजरीवाल यांच्यावरील कारवाईविरोधात इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने पेंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली. ऐन निवडणुकीत तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. अशा वेळी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका कशा होणार? लोकशाहीवर आघात करणारी ही बाब आहे. यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी इंडियाने केली. तपास यंत्रणांविरोधात पुरावेही देण्यात आले.

देशभरात निदर्शने

दिल्ली, पंजाब, हरयाणा, महाराष्ट्र, गुजरातसह विविध राज्यांत आपने केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ संतप्त
निदर्शने केली. दिल्लीत कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यात मंत्री अतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

केजरीवाल मद्य घोटाळय़ाचे मुख्य सूत्रधार, ईडीचा दावा

ईडीने आज केजरीवाल यांना राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर केले. यावेळी केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे व अटकेपूर्वी त्यांना कल्पना देण्यात आली नाही, असे केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी नमूद केले. तर ईडीने चौकशीसाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. केजरीवाल या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा दावा ईडीने केला. त्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांना सात दिवसांची (28 मार्चपर्यंत) ईडी कोठडी दिली.

पप्पा… अण्णा आले रे

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अचानक प्रकटले आणि त्यांनी केजरीवालांना लक्ष्य केले. मद्य धोरणावर आक्षेप घेणारी दोन पत्रे मी केजरीवाल यांना लिहिली होती पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि आता त्याच धोरणामुळे त्यांना अटक झाली. आता ते आणि सरकार बघून घेतील, असे अण्णा म्हणाले.