ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्यास केजरीवाल यांचा पुन्हा नकार

अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचलनालयाने चौथे समन्सय धाडले होते. मात्र या समन्सनंतरही आपण ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाही या भूमिकेवर अरविंद केजरीवाल ठाम आहेत. चौकशीसाठी बोलावून अटक करण्याचा हा डाव असल्याचे केजरीवाल यांनी यापूर्वीच म्हटले आहे. आपनेही याचा पुनरुच्चार केला असून केजरीवालांना अटक करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे आपचे म्हणणे आहे.

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौथ्यांदा समन्स धाडले होते. दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने (Enforcement Directorate) केजरीवाल यांना 18 जानेवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. याआधी ईडीने केजरीवाल यांना तीन वेळा समन्स पाठवले होते. मात्र तिन्ही वेळेस केजरीवाल चौकशीसाठी अनुपस्थित राहिले.

अबकारी धोरण प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना यापूर्वी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि 3 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. या तिन्हीवेळी केजरीवाल हजर राहिले नाहीत. तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर केजरीवाल यांनी ईडीला एक खरमरीत पत्र पाठवून 26 जानेवारीपर्यंत कार्यक्रमात व्यस्त असल्याने आपण चौकशीसाठी ईडी कार्यालयात येऊ शकत नाही, जर ईडीला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी लिखित स्वरूपात विचारावे, त्या सर्व प्रश्नाला उत्तर दिले जाईल, असे नमूद केले होते.