मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार

बहुजन समाज पार्टीच्या (Bahujan Samaj Party) अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha election 2024) रंणशिंग फुंकले असून स्वबळाचा नारा दिला आहे. लखनौमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी समाजवादी पार्टीसह भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

मायावती यांनी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये येण्यास असमर्थता दर्शवत देशभरात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. युतीमुळे पक्षाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. यामुळे आमच्या मतांची टक्केवारी घटते आणि इतर पक्षांना फायदा होतो. त्यामुळे अधिकाधिक पक्ष बसपाशी युती करून निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छितात. पण आमचा पक्ष स्वबळावर लोकसभा निवडणूक लढेल, अशी घोषणा मायावती यांनी केली.

दलिताच्या हाती नेतृत्व असल्याने आम्ही स्वबळावर निवडणूक लढतो. युती केल्यावर बसपाची मतं दुसऱ्या पक्षाला जातात, पण दुसऱ्या पक्षाला मिळणारी सवर्णांची मतं बसपाला मिळत नाहीत, असे म्हणत मायावती यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.

उत्तर प्रदेशमध्ये आम्ही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढलीही आणि सरकारही बनवले. त्यामुळे आम्ही कोणालाही पाठिंबा (एनडीए किंवा इंडिया आघाडी) देणार नाही. निवडणुकीनंतर आम्ही याचा विचार करू शकतो, असेही मायावती यांनी स्पष्ट केले. बसपा दलित, आदिवासी, मागासवर्गीय, मुसलमान आणि अल्पसंख्यांक्यांच्या जीवावर एकट्याने निवडणुकीला सामोरे जाईल असेही त्या म्हणाल्या.

केंद्रावर निशाणा

आजकालचे सरकार नावं बदलण्यात आणि घोषणा करण्यात व्यस्त आहे. त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. भाजप, काँग्रेसची तत्वनिष्ठ आणि जातीयवादी विचारसरणी आहे. केंद्र आणि राज्य सरकार धर्म आणि संस्कृतीचे राजकारण करत असून त्यामुळे लोकशाही कमकुवत होत असल्याची टीकाही त्यांनी केली.