ईव्हीएमवरील बंदीसाठी ऑनलाईन मोहीम, लोकसभा निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी

आगामी लोकसभा निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावी, या मागणीसाठी ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आली आहे. पॉल कोशी या नावाच्या एका नागरिकाने ही मोहीम सुरू केली असून त्याने त्याच्या ‘एक्स’ हॅण्डलवर या मोहिमेत सहभागी होण्यासाठी https://t.co/1SX6SIM0tT लिंक दिली आहे. या मोहिमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नुकत्याच पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपला विजय मिळाला आहे, तर तेलंगणात काँग्रेसला आणि मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षाला सत्ता मिळाली. देशात प्रचंड महागाई आणि बेरोजगारी वाढलेली आहे. यामुळे देशात पेंद्र सरकारविरोधात बेरोजगार तरुणांसह गृहिणींचाही संताप आहे. तरीही पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत भाजपला विजय मिळाला आहे. यामुळे अनेकांच्या मनात ईव्हीएमसंबंधी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतदान हे मतपत्रिकेवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भाजपने ईव्हीएमशी छेडछाड केल्याचा तसेच मध्य प्रदेशात भाजपच्या विजयामागे ईव्हीएमचाच हात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

या देशात ईव्हीएमवर बंदी

इंग्लंड,  फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, यूएसए, व्हेनेझुएला, युव्रेन, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलंड, जपान, मलेशिया, नॉर्वे, पाकिस्तान, स्वीडन, स्पेन, झिम्बाब्वे यांसारख्या प्रगत देशात ईव्हीएमवर बंदी असून या ठिकाणी मतपत्रिकेवरच मतदान घेतले जाते.