बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान पाडली, दीडशे कुटुंबांचा मुंबईकडे लाँग मार्च!

बेडग गावातील ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडणाऱया सरपंचाला पाठीशी घालून गावात जातीयता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ आणि दलित समाजाला न्याय मिळावा, यासाठी गावातील दलित समाजातील दीडशे कुटुंबे घरदार सोडून मुंबईला मंत्रालयाकडे चालत निघाली आहेत. दरम्यान, मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या दबावाखाली प्रशासकीय यंत्रणा काम करीत असल्याचा आरोप डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला.

याबाबत आंदोलकांनी दिलेली अधिक अशी की, एक महिन्यापूर्वी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागतकमान उभारण्यात येत होती. बेडग ग्रामपंचायतीने कमान उभारण्यासाठी परवानगीही दिली होती. मात्र, 16 जून रोजी कमान बेकायदेशीर असल्याचे ठरवत ग्रामपंचायतीने बांधकाम सुरू असलेली स्वागतकमान पाडून टाकली. यानंतर जिह्यातील आंबेडकरप्रेमींनी याला विरोध केला होता. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कमान पाडणाऱया सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करीत आंबेडकरप्रेमींकडून आंदोलन करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून सरपंच उमेश पाटील यांच्यासह संबंधितांना पाठीशी घातल्याचा आरोप केला. गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारण्यास विरोध होतोय आणि न्याय मिळत नाही, या भावनेतून बेडग ग्रामस्थांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला.

पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या आशीर्वादामुळे बेडगमध्ये दलित समाजावर अन्याय होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज इथपर्यंत पोहोचलेल्या खाडे यांना त्याचे काही वाटलेले नाही. समाजाला न्याय मिळावा, यासाठी जिह्यातील सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधींची भेट घेतल़ी मात्र, न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आम्ही न्याय मागणार आहोत. तेथे आम्हाला न्याय मिळेल, याची खात्री आहे.

– डॉ. महेशकुमार कांबळे,
अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागतकमान बचाव समिती