Jamkhed News : डॉ. भास्कर मोरेचा जामीन अर्ज जामखेड न्यायालयाने फेटाळला

विनयभंगाच्या गुह्यात अटक असलेल्या डॉ. भास्कर मोरे याने दाखल केलेला जामीनअर्ज जामखेड न्यायालयाने सोमवारी फेटाळला. त्यामुळे डॉ. मोरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या, मोरे हा वन्यप्राणी पाळल्याप्रकरणी वन विभागाच्या कोठडीत आहे.

‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन ऍण्ड रिसर्च सेंटर’चा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात 5 मार्चपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर 7 मार्चपासून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले हेदेखील उपोषणास बसले आहेत.

डॉ. मोरेविरोधात 8 मार्चला विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 13 मार्चला त्याला अटक करून जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानुसार जामखेड न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर हरीण पाळल्याप्रकरणी भास्कर मोरेला वन विभागाने अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला 20 मार्चपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

आज आरोपीच्या जामीन अर्जावर मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड. सुमीत बोरा व ऍड. अमोल जगताप तसेच सरकारच्या वतीने सरकारी वकील ऍड. संदीप नागरगोजे यांनी बाजू मांडली. आरोपी भास्कर मोरे याने केलेला गुन्हा सामाजिक व्यवस्थेवर आघात करणारा असून, आरोपी फरार होण्याची शक्यता आहे, अशी बाजू मांडली. जामखेड न्यायालयाने वरील बाबींचा विचार करून व फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी भास्कर मोरेचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे भास्कर मोरेच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे.