भीमगीतांचा जलसा, पुस्तकांची मांदियाळी; पालिकेकडून शिवराय, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर ‘ऋणानुबंध’ सोहळा

मुंबई महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांच्या ‘ऋणानुबंध अभियान’ या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या ‘संयुक्त जयंती महोत्सवा’ चे आयोजन केले आहे. शनिवार, 27 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय व उद्यान येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

पालिका कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऋणानुबंध अभियान’ या संस्थेच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदादेखील पालिकेच्या भायखळास्थित अण्णाभाऊ साठे सभागृहात तिन्ही महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध-भीमगीतांचा जलसा आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सचिन मगरे यांनी दिली. महोत्सवात यूपीएससी, एमपीएससी  परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप, महाराष्ट्रातील सामाजिक कर्तृत्व व नावलौकिक मिळविलेल्या स्त्रियांचा गौरव, आफ्रिकेतील किलीमंजरो शिखर सर केलेल्या गिर्यारोहकांचा सत्कार, संदेश विठ्ठल उमप आणि रागिणी मुंबईकर यांच्यासह नामांकित गायक कलावंताच्या बुद्ध-भीमगीतांचा जलसा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके 90 टक्के सवलत दरात उपलब्ध केली जाणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव आणि निवृत्त मुख्य आयकर आयुक्त सुबच्चन राम यांच्या व्याख्यानाचे आयोजनदेखील केले आहे.