भाजपने गुजरातमध्ये दलित शेतकऱ्याला फसवले, 11 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी करायला लावले

ईडी, सीबीआयची भीती दाखवून कंपन्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांनाही सोडले नाही. भाजपने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अंजारा गावच्या दलित शेतकऱ्याला एका प्रकल्पासाठी अदानीला जमीन विकण्यास भाग पाडले. त्यानंतर दीडपट परताव्याचे आमिष देऊन 11 कोटी 14 हजारांचे निवडणूक रोखे खरेदी करायला लावले. यातील 16 ऑक्टोबर 2023 रोजी भाजपने 10 कोटी तर 18 ऑक्टोबर 2023 रोजी मिंधे गटाने 1 कोटी 14 हजारांचे रोखे वटवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

तब्बल 76 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 16 कोटी 61 लाख 21 हजार 877 रुपयांना खरेदी करण्यात आली. त्यानंतर या दलित शेतकऱयाच्या कुटंबातील सहा सदस्यांच्या नावावर 11 कोटी 14 हजार रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी करण्यात आले.

गुजरातमधील 41 वर्षीय हरेश सावकारा यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची भाजपने कशाप्रकारे लुबाडणूक केली याबाबतची माहिती दिली. अदानी समूहाशी निगडीत पंपनी वेलस्पन एंटरप्रायजेस लिमिटेडच्या अधिकाऱयाने फसवणूक करून निवडणूक रोखे खरेदी करायला लावल्याचा आरोप सावकारा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. वेलस्पन पंपनीने एका प्रकल्पासाठी सावकारा कुटुंबाकडून जवळपास 43 हजार चौरस मीटर शेत जमिनीचे अधिग्रहण केले.

नेमके काय घडले?

अंजार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाकडे सावकारा यांनी तक्रार दाखल केली. ऑगस्ट 2023 मध्ये जिल्हा प्रशासनाने सावकारा यांची शेतजमीन वेलस्पनला 16 कोटी 61 लाख एकवीस हजार आठशे सत्त्याहत्तर या रकमेला विकण्याची मंजुरी दिली. या व्यवहारांतर्गत 2 कोटी 80 लाख 15 हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते. तर 13 कोटी एक्क्यांशी लाख नऊ हजार 872 रुपयांची रक्कम अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनीच्या सात जॉइंट होल्डर्सना ट्रान्सफर करण्यात आली.

वेलस्पनचे संचालक विश्वनाथन कोलेंगोडे, संजय गुप्ता, चिंतन ठाकेर आणि प्रवीण भंसाली तसेच वेलस्पनचे वरिष्ठ महाव्यवस्थापक महेंद्रसिंह सोढा, अंजारचे भूमी अधिग्रहण अधिकारी किशोर जोशी तसेच भाजपचे अंजार शहर अध्यक्ष हेमंत ऊर्फ डॅनी रजनीकांत शाह यांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सावकारा कुटुंबीयांसोबत तब्बल चार बैठका घेण्यात आल्या आणि निवडणूक रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आले.

शाह यांनी मात्र निवडणूक रोख्यांबाबत सावकारा यांच्यासोबत झालेल्या बैठकांविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.

सावकारा कुटुंबाकडून जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया ऑक्टोबर 2022 ला सुरू झाली. भूमी अधिग्रहण समितीने जमिनीचे मूल्य 17 हजार 500 रुपये प्रति चौरस मीटर दाखवले.

सावकारा कुटुंबाकडे असलेल्या जमिनीचे एकूण मूल्य जवळपास 76 कोटी रुपये दाखवण्यात आले; पण वेलस्पन इतकी मोठी रक्कम देण्यास तयार नव्हते. त्यामुळे वर्षभरापासून जमीन खरेदीची प्रक्रिया थांबली होती.

जमीन विकून मिळालेले 16 कोटी 61 लाख 21 हजार 877 रुपये बँक खात्यात ठेवल्यास आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागू शकतो. त्यामुळे हे पैसे निवडणूक रोख्यांमध्ये गुंतवावे, त्यातून वर्षभरातच दीडपट अधिक मोबदला मिळेल असे वेलस्पनचे वरिष्ठ महाव्यवस्थापक महेंद्रसिंह सोढा तसेच इतर अधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी हेमंत शाह यांनी सांगितले.

आयकर विभागाची भीती दाखवली

आम्ही अडाणी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि निवडणूक रोख्यांची खरेदी केली, असे हरेश सावकारा यांनी सांगितले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे कळताच हरेश सावकारा यांनी 18 मार्च 2024 रोजी अंजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, याप्रकरणी अधिक तपास करून तक्रारीत तथ्य वाटले तरच गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.