भाजपला परग्रहांवर 800 जागा मिळतील! शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा टोला

भाजपची प्रचारातील भाषणे पाहिल्यास दोन धर्मांत, जाती-जातींत, जिह्यांमध्ये वाद निर्माण करायचे, अशी भाषा वापरली जात आहे. भाजप जेव्हा हरायला लागते तेव्हाच ही समीकरणे लोकांसमोर आणते. यावरून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीसाठी चांगले मतदान झाले आहे, हे दिसून येते. देशात भाजपची अवस्था ही ‘दक्षिणेत साफ आणि नॉर्थमध्ये हाफ’ अशी झाली असताना 400 पारचा नारा देणाऱया भाजपला कदाचित 800-900 जागा नक्कीच मिळतील. पण त्या या देशात, पृथ्वीवर नाही तर चार-पाच वेगवेगळ्या ग्रहांवर, चंद्रावर या जागा मिळतील, असा टोला शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला.

मिध्यांचे पैशांचे गोडाऊन सापडले होते!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेल की भाजप? असा पर्याय दिला होता. त्यांचे पैशांचे गोडाऊन सापडले होते. आयकर विभागाची धाड पडली होती. भाजपसोबत येताय की जेलमध्ये टाकू? असे धमकावले होते. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आणि ‘भाजपवाले मला धमकावत आहेत, जेलमध्ये जाण्याचे माझे वय नाही, मला ते आत टाकतील. भाजपसोबत चला,’’ अशी विनवणी ते करीत होते. अटकेच्या भीतीनेच शिंदे आणि 40 गद्दार आमदार सुरतला पळाले. तसेच खासदारही गेले. यात मावळचे खासदारही होते.

भाजपची एक पॉलिसी आहे, ‘खोटं बोला, पण रेटून बोला!’ मिंध्यांची ‘खोटं बोला, पण रडून बोला’ अशी पॉलिसी असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. डांबरचोर, मातीचोर, काsंबडय़ाचोर सगळेच असे लोक ‘एनडीए’मध्ये घेतले आहेत. जेव्हा जेव्हा भाजप चारशे पार सांगत असेल, तेव्हा भाजप चंद्रावर 400 पार करीत असेल. मात्र हिंदुस्थानमध्ये दोनशेपण भाजप पार करणार नसल्याचे, आदित्य ठाकरे म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर आकुर्डी येथे वज्रमूठ सभा पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि मिध्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 125 जागांवर लढलो. त्यावेळी भाजपने अनेक ठिकाणी बंडखोरी केली. भाजप असो की मिंधे असोत, ‘त्यांना ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात’ अशी स्थिती आहे. गेल्या पाच वर्षांत 15 लाख रुपये खात्यांत टाकणे असो, पंतप्रधान आवास योजना असो, असे भाजपचे अनेक जुमले आपण ऐकले आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांच्यावर विश्वास टाकून पाहिला; पण संपूर्ण देशाचा त्यांनी घात केला आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. सगळीकडे गँग उभ्या राहत आहेत. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडत आहे.’

भाजप हिंदू-मुस्लिम, मटण-मांसावर प्रचार करू लागले आहे

दहा वर्षे बहुमताचे सरकार चालवल्यानंतर नोटाबंदीमुळे देशात कसे चांगले घडले, काळा पैसा कसा सगळ्यांच्या खात्यात आला, दहशतवाद कसा संपला, खोटय़ा नोटा कशा संपल्या, 100 स्मार्ट सिटी कोणत्या देशात बनवल्या, जीएसटीची यशोगाथा यावर बोलले पाहिजे. मात्र, ते सोडून हिंदू-मुस्लिम, मटण-मांस यावर भाजप प्रचार करू लागले आहे, हे दुर्दैव आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

घोटाळे करणे हेच मिंध्यांचे काम

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘लोकायुक्तांकडे फर्निचरच्या घोटाळ्याबाबत आमची सुनावणी सुरू आहे. रस्त्यांचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासकांना त्यात एक हजार कोटी कमी करायला लागले. सहा हजार 80 कोटींचे त्यांना पाच हजार कोटींवर आणावे लागले. त्यातून आम्ही अॅडव्हान्स मोबायलायझेशन व व्हेरिएशनही थांबवायला सांगितले होते. 2023 च्या जानेवारीत सुरू झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये एक किलोमीटरचाही रस्ता पूर्ण झालेला नाही. हा घोटाळाच आहे. त्यांनी पाच ठेकेदारांना काम देण्यासाठी हे केले होते. महाराष्ट्रात खडी घोटाळा, रुग्णवाहिका घोटाळा असे अनेक घोटाळे आहेत. कामे न करणे, घोटाळा करणे हेच काम मिंधे सरकारने केले आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

भाजप सर्वांची संपत्ती अदानीला देत आहे

‘काँग्रेसने इतर धर्मीयांची सर्व संपत्ती काढून घेऊन मुस्लिमांना देण्याचा त्यांच्या वचननाम्यात उल्लेख केला आहे,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गेल्या दोन दिवसांपासून केला जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘पंतप्रधानांकडून असे वक्तव्य होणे हे दुर्दैवी आहे. भाजपच आता जातपात-धर्म न पाहता आपली सर्वांची संपत्ती घेऊन एका उद्योगपतीला देत आहे. त्याविरोधात हा देश आहे. अदानींच्या हातात सर्वांची संपत्ती चालली आहे. अदानीमुळे मुंबईत विजेची बिले वाढणार आहेत. याविरोधात आम्ही आहोत. भाजपचे सरकार आम्ही येऊ देणार नाही.