मुंबईत नळाला गढूळ पाणी, पालिकेने पाणी उकळून पिण्याचे केले आवाहन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांत पावसाळय़ामुळे गढूळ पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरही शहरात साठवल्या जाणाऱया 32 सेवा जलाशयांमध्ये काही प्रमाणात गढूळ पाणी आढळले आहे. महापालिकेच्या ‘बी’ विभागात येणाऱया डोंगरी, उमरखाडीत हे प्रमाण सर्वाधिक आहे, मात्र त्यात कोणतेही घातक घटक नाहीत. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वार्षिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबईकरांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी मुंबईतील 32 सेवा जलाशयांमध्ये साठवले जाते आणि त्यानंतर ते मुंबईकरांकडे पोहोचते. मुंबईचा पाणीपुरवठा अचानक खंडित झाला तर किमान एक दिवस पाण्याचा साठा या सेवा जलाशयांमध्ये असतो, मात्र पावसाळय़ात भांडुप आणि पिसे-पांजरापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन टाकून पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाते आणि पुढे मुंबईकरापर्यंत पोहोचते. पावसाळय़ात तलावांमधून शुद्धीकरण प्रकल्पात येणारे पाणी हे गढूळ असल्यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया झाल्यानंतरही ते काही प्रमाणात गढूळ राहते. त्यामुळे सेवा तलावांतही ते त्यात प्रमाणात येते, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

शुद्धतेचे जागतिक मापदंड

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, शहरी भागात 5 टक्के तर ग्रामीण भागांत 10 टक्के पाणी अशुद्ध असेल, असे गृहीत धरले जाते, मात्र मुंबई महापालिकेने अशुद्ध पाण्याचे प्रमाण 1 टक्क्यांहून कमी राखण्यात सलग 6 वर्षे यश मिळवले आहे.

सहा वर्षांचा वार्षिक पाणी अहवाल
एप्रिल 2017 ते मार्च 2018 – 0.2
एप्रिल 2018 ते मार्च 2019 – 0.1
एप्रिल 2019 ते मार्च 2020 – 0.1
एप्रिल 2020 ते मार्च 2021 – 0.1
एप्रिल 2021 ते मार्च 2022 – 0.1
एप्रिल 2022 ते मार्च 2023 – 0.3

वार्ड अशुद्धतेचे प्रमाण

ए 1.3
बी 6.7
सी 0.6
डी 1.6
ई 1.2
एफ-दक्षिण 0.5
एफ-उत्तर 0.2
जी-दक्षिण 0.3
जी-उत्तर 1.7
एच-पूर्व 1.6
एच- पश्चिम 0.4
के-पूर्व 0.2
के-पश्चिम 0.4
पी-दक्षिण 0.2
पी-उत्तर 0.4
आर-दक्षिण 0.3
आर-मध्य 2.1
आर-उत्तर 0.6
एल 0.2
एम-पूर्व 0.7
एम-पश्चिम 0.8
एन 0.6

दररोज पाण्याच्या नमुन्यांची तपासणी

जल खात्याच्या गुणनियंत्रण विभागाने मुंबईत 358 पाणी नमुना ठिकाणे निश्चित केलेली आहेत. येथील पाण्याचे नमुने आरोग्य खाते आणि गुणनियंत्रण विभागामार्फत दररोज (रविवार व सुट्टी वगळून) घेतली जातात. शिवाय मुंबईतील 32 सेवा जलाशयांचे नमुने दरदिवशी या प्रयोगशाळेत तपासले जातात. पालिका महिनाभरात तीन हजार पाण्याचे नमुने तपासते. दरम्यान, पालिकेची लॅब पाण्याचे नमुने तपासण्यासाठी आधुनिक मेंब्रिन फिल्टर टेक्निक (‘एमएफटी’) पद्धत वापरते. त्यामुळे 18 तासांत अचूक नमुने तपासले जातात.

सेवा जलाशयांमध्ये जमा झालेले पाणी तिथे आल्यावर काही काळासाठी साठून राहणे आणि स्थिर होणे आवश्यक असते. स्थिरीकरणामुळे गढूळ पाणी खाली बसते आणि चांगले पाणी पुढे पाठवणे शक्य होते.

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला 24 तास पाणीपुरवठा सुरू असतो. त्यामुळे सेवा जलाशयांमध्ये जमा झालेले पाणी पुन्हा जसेच्या तसे मुंबईकरांसाठी पाठवले जाते. त्यात सेवा जलाशयांची क्षमता कमी असल्यामुळे ही क्षमता वाढवणे आवश्यक आहे.

जलाशयांचा आडवा विस्तार करता येणार नाही. त्यासाठी पुरेशी जागा नाही, मात्र युरोप आणि इतर देशांप्रमाणे या जलाशयांची उंची वाढवली जाऊ शकते.