विधी अधिकाऱ्यांना चहल यांचे असहकार्य

बेहिशेबी मालमत्तेचा आरोप असलेल्या पालिका विधी अधिकाऱयाच्या चौकशीसाठी आयुक्त इक्बालसिंह चहल हे सहकार्य करीत नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने एसीबीला चौकशी आणि गुन्हा दाखल करण्यास मोकळीक दिल्याने विधी अधिकारी सुनील सोनावणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

पालिकेचे विधी अधिकारी सुनील सोनावणे यांच्याकडे विक्रोळीतील 3 कोटी 56 लाखांच्या फ्लॅटव्यतिरिक्त इतर बेहिशेबी मालमत्ता आहे. शासकीय अधिकाऱयाकडे एवढी मालमत्ता कुठून आली, याची चौकशी व्हावी तसेच सोनावणे यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यासाठी ईडी व एसीबीला निर्देश द्यावेत, अशी मागणी करीत अॅड. निखिल कांबळे यांनी अॅड. संदेश मोरे यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका दाखल केली.