पारनेर सैनिक बँकेचा शाखाधिकारी फरांडे पोलिसांत हजर

 

पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेमध्ये चार कर्मचाऱयांनी संगनमत करून 1 कोटी 80 लाख रुपयांचे रिलायन्स कंपनीचे धनादेश वटवले होते. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे यांना पुरवणी जबाबांमध्ये लेखापरीक्षकांच्या अहवालावरून आरोपी करण्यात आले. यानंतर आज शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेमध्ये सन 2020 यावर्षी बँकेचे कर्मचारी नितीन सुंदर मेहर यांनी हनुमंत ज्ञानदेव नेवसे, विशाल मधुकर पवार यांना हाताशी धरून कोरोनाकाळात बँकेत खाते उघडले आणि रिलायन्स जिओ यासह इतर कंपन्यांचे 1 कोटी 80 लाख रुपयांचे चेक वेगवेगळ्या नावाचे बँकेत जमा करून घेतले व ते चेक नगर जिल्हा बँकेत बँकेचे उपशाखा व्यवस्थापक दीपक पवार यांच्यामार्फत जमा केले. नितीन मेहेर यांनी स्वतःचा कोड वापरून आठ धनादेश पारनेर सैनिक बँकेत जमा करून घेतले. याशिवाय इतर दोन कर्मचारी रेश्मा मन्यार व बाबासाहेब साळवे यांनी स्वतःचा कोड वापरून प्रत्येकी एक धनादेश पारनेर सैनिक बँकेत जमा करून घेतला होता. याप्रकरणी पोलिसांनी नितीन मेहर, हनुमंत नेवसे, विशाल मधुकर पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड नितीन सुंदर मेहेर हा मात्र राजरोसपणे फिरत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे रिलायन्स जिओ कंपनीचे 1 कोटी 80 लाख रुपयांचे धनादेश वटवले गेले आहेत. त्या कंपनीची एवढी मोठी रक्कम गेली असली, तरी बँकेने या संदर्भात कोणतीही तक्रार केलेली नाही.

जाणीवपूर्वक मला अडकवण्यात आले – फरांडे

या संदर्भात आज बँकेचे शाखाधिकारी सदाशिव फरांडे यांनी कर्जत येथे पत्रकार परिषद घेतली. सदाशिव फरांडे म्हणाले, कोरोनाकाळात झालेला हा गैरव्यवहार बँकेचे कर्मचारी नितीन सुंदर मेहेर यांनी केला आहे. त्याला रेश्मा मण्यार, बाबासाहेब साळवे यांनी मदत केली. यात माझी कुठेही स्वाक्षरी नाही. वसुली अधिकारी म्हणून काम करत असताना कर्जत-जामखेडचा चार्ज माझ्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे उपशाखा व्यवस्थापक पवार यांना सर्व अधिकार होते. आजी-माजी संचालकांनी मेहेर याला वाचवण्यासाठी माझा बळी दिला आहे. पोलीस चौकशीमध्ये माझे नाव नसताना, लेखापाल यांच्या मदतीने संदिग्ध अहवाल देऊन जाणीवपूर्वक मला अडकवण्यात आले आहे. पुरवणी यादीमध्ये माझे नाव आल्यामुळे मी स्वतःहून पोलिसांत हजर झालो. बँकेचे तीन कर्मचारी नितीन मेहेर, रेश्मा मण्यार, बाबासाहेब साळवे यांचा यात सहभाग असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यासाठी संचालक मंडळ आग्रही नाही, असेही ते म्हणाले. यावेळी बँकेचे संचालक हरिभाऊ खेडकर, राजेंद्र जगताप, श्रीकांत तोरडमल व मेजर फरांडे, अनिल गदादे, संदीप गदादे, नितीन तोरडमल, मेजर शिंदे, फलके उपस्थित होते.