‘रेबिजमुक्त मुंबई’ मोहीम अंतर्गत 6 विभागातील मिळून 14 हजार 191 भटक्या प्राण्यांचे लसीकरण

मुंबईतील भटक्या प्राण्यांचे लसीकरण तसेच ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधत दिनांक 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2023 या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 प्रशासकीय विभागात रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या दाट लोकवस्तीच्या परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 14 हजार 191 भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यात 9 हजार 493 भटके श्वान आणि 4 हजार 698 भटक्या मांजरांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष 2030 पर्यंत भटके प्राणी विशेषतः श्वानांपासून होणाऱ्या रेबिज रोगाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी दोन्ही संस्था नि:शुल्क सेवा देणार आहेत.

भटक्या प्राण्यांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिजची लस देणे गरजेचे असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधत दिनांक 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2023 या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या वतीने 6 प्रशासकीय विभागात रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यात आर उत्तर , आर मध्य, आर दक्षिण, पी उत्तर, एस आणि टी या सहा विभागांचा समावेश आहे.

दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत 9 हजार 493 भटक्या श्वानांचे व 4 हजार 698 भटक्या मांजरांचे असे एकूण 14 हजार 191 भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले.

दिनांक 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दररोज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेसाठी एकूण 15 पथके तैनात करण्यात आली होती. त्यात हाताने प्राणी पकडणाऱ्या 10 पथकांचा तर जाळीने प्राणी पकडणाऱ्या 5 पथकांचा अंतर्भाव होता. या प्रत्येक पथकात एक लसटोचक, एक माहिती संकलक आणि पशू कल्याण संस्थेचा एक प्राणी हाताळणीस स्वयंसेवक यांचा समावेश होता.

देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत 14 हजार 191 भटक्या प्राण्यांचे लसीकरण आले आहे. या मोहिमेत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मिशन रेबिज, वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस, मुंबई ऍनिमल असोसिएशन, बाई साकरबाई दिनशॉ पेटिट पशुवैद्यकीय रुग्णालय, अहिंसा, जीव दया अभियान, इन डिफेन्स ऑफ ऍनिमल, युथ ऑर्गनायझेशन इन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, ऍनिमल मॅटर्स टू मी, जीव रक्षा ऍनिमल वेलफेअर ट्रस्ट, जेनीस स्मिथ ट्रस्ट आणि युनिव्हर्सल ऍनिमल वेलफेअर सोसायटी या संस्थादेखील सहभागी झाल्या होत्या.

पाळीव श्वानांचे लसीकरण करावे, नोंदणी करून परवाना प्राप्त करावा

मुंबईतील नागरिकांनी त्यांचेकडे असलेल्या पाळीव श्वानाचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. तसेच पाळीव श्वानाची नोंदणी केली नसेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in यावर भेट देवून नोंदणी करून पाळीव श्वान परवाना प्राप्त करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.