आत्मविश्वास वाढवणारे गरुडासन

>> सीए अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर 

गरुडासन केल्याने माणसाची मनोवृत्ती सकारात्मक होते. मनातील नैराश्य आणि औदासीन्य दूर होते. माणूस आत्मविश्वासाने झगमगू लागतो.

कश्यप ऋषीची पत्नी आणि दक्ष प्रजापती व प्रसूती यांची कन्या विनता हिचा पराक्रमी पुत्र गरुड. विनतेचा पुत्र म्हणून वैनतेय. आपल्या मातेची दास्यत्वातून मुक्ती करण्यासाठी त्याने देवांशी युद्ध करून अमृतकलश जिंकून घेतला होता. हा विष्णूचा परमभक्त झाला आणि विष्णूचे वाहन म्हणून प्रख्यात झाला.

गरुडासनाने मनाची एकाग्रता वाढते, ध्येय साध्य करण्याची चिकाटी वाढते म्हणूनच आसनाचे नाव विनतापुत्रावरून गरुडासन किंवा वैनतेयासन असे पडलेले आहे. विष्णूच्या मूर्तीपुढे कटिबद्ध अवस्थेत नमस्कार करून उभ्या असलेल्या गरुडाप्रमाणेच योगसाधकाची शारीरिक स्थिती दिसते आणि म्हणूनही याला गरुडासन म्हटले असावे.

या आसनाचे लाभ

आसनाचा मुख्य फायदा हा आपल्या खांद्यांना, आपल्या छातीला, आपल्या भुजांच्या नसांना विशेषकरून होतो. या आसनामध्ये आपल्या पाठीच्या वरच्या भागाचे स्नायू हे पुढे खेचले जातात आणि त्यामुळे पाठीच्या वरच्या मणक्यांना चांगलाच व्यायाम मिळतो. आपल्या भुजांच्या नसा खेचल्या जातात. त्याच वेळी आपल्या दोन्ही हातांचा दबाव आपल्या छातीच्या स्नायूंवर पडतो. त्यामुळे फुप्फुसांमध्ये होणारी रुधिराभिसरणाची क्रियाही सुधारते आणि शरीरामध्ये रुधिराभिसरण उत्कृष्टपणे सुरू होते. आपली नजर आपण हाताच्या तर्जनीवर एकाग्र केल्याने आपल्या डोळ्यांनाही व्यायाम मिळतो आणि त्याच वेळी आपल्या मनाची एकाग्रता वाढते, चलबिचल दूर होते. मनातील नैराश्य आणि औदासीन्य दूर होते. आत्मविश्वास वाढतो, सकारात्मकता वाढते.

आसनाचा विधी

यासाठी सर्वप्रथम सरळ ताठ उभे रहावे. आपले दोन्ही हात आपल्या खांद्यांच्या रेषेत समोर पसरून ठेवावेत. नंतर हात दुमडून कोपरे एकावर एक ठेवावेत आणि एका हाताने दुसऱया हाताला लपेटून ठेवावे. अजगर अन्न भक्षण केल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या झाडाच्या फांदीभोवती लपेटून ठेवतो त्याप्रमाणे आपल्या एका हाताने दुसऱया हाताला लपेटून ठेवायचे असते. आपल्या हाताचे कोपरे हे आपल्या खांद्यांच्या रेषेमध्ये आले पाहिजेत. हात आपल्या बाजूला झुकवून ठेवता सरळ ठेवावेत. आपली नजर ही वरच्या हाताच्या तर्जनीच्या टोकावर ठेवावी. गरुडाप्रमाणे आपली नजर आपल्या तर्जनीवर पेंद्रित करून ठेवावी. याला हस्ताग्रदृष्टी असेही म्हणतात. 30 ते 40 क्षणपावेतो हातांची ही स्थिती स्थिर ठेवावी. दृष्टी आणि लक्ष तर्जनीवर स्थिर झाल्यानंतर भरपूर श्वास भरून दीर्घ ओंकाराचा उच्चार करावा आणि त्यानंतर हेच आसन दुसऱया बाजूनेही करावे. आसनाची कमीत कमी दोन आवर्तने करावीत. शक्य असल्यास एका पायाने दुसऱया पायालाही लपेटून ठेवावे, परंतु पाय लपेटून ठेवल्याने शरीराचे संतुलन साधणे अवघड होते

 www.bymyoga.in