सीबीआयचे संचालक सुबोध जायस्वाल चौकशीसाठी गैरहजर

फोन टॅपिंगप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक आणि सध्या सीबीआयचे संचालक सुबोध जायस्वाल यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी आज बोलावले होते. मात्र जायस्वाल हे चौकशीसाठी गैरहजर राहिले.

राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील बदल्या आणि बढत्या, पोलीस अधिकारी आणि खासगी व्यक्ती यांच्यात झालेले संभाषण टॅप करून त्याचा अहवाल बनवला होता. तो गोपनीय अहवाल लीक झाला होता. त्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी रश्मी शुक्ला यांचादेखील जबाब नोंदवून घेतला होता. त्यानंतर गेल्या आठवडय़ांत पोलिसांनी जायस्वाल यांना ई-मेलवरून समन्स पाठवून आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितले होते. पण जायस्वाल हे आज जबाब नोंदवण्यासाठी आले नाहीत.