Chef Kunal Kapur Divorce- पत्नीच्या त्रासाला कंटाळला, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरचा 16 वर्षांनी घटस्फोट

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्नीच्या क्रूरतेचे कारण देत दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी कुणाल कपूरचा घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, कुणालच्या पत्नीचे त्याच्याबद्दलचे वागणे सहानुभूतीपूर्ण नव्हते. यापूर्वी कौटुंबिक न्यायालयात कुणालची घटस्फोटची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

कुणाल कपूरने 2008 साली एकता कपूर नावाच्या महिलेशी लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2012 मध्ये ते एका मुलाचे पालक झाले. परंतु लग्नाच्या काही वर्षांनंतरच त्यांच्या नात्यात मीठाचा खडा पडला. त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. रोजच्या जाचाला कंटाळून  कुणालने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत कुणालने पत्नी एकतावर अनेक गंभीर आरोप केले. कुणालच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीने कधीच त्याच्या आई-वडिलांचा आदर केला नाही. नेहमी ती त्यांचा अपमान करायची. तसेच त्याच्या कुटुंबाचा छळ करायची, असे त्याने सांगितले होते.

दुसरीकडे, कुणालच्या पत्नीचे म्हणणे होते की, तिने नेहमीच पत्नीची जबाबदारी पार पाडली आहे. ती नेहमीच पती आणि कुटुंबाशी एकनिष्ठ राहिली आहे. कुणालने आपल्याला अंधारात ठेवले आणि घटस्फोटासाठी खोट्या कथा रचल्या, असा आरोप शेफच्या माजी पत्नीने केला होता.

शेफ कुणाल विरोधात कोणताही पुरावा कोर्टात सिद्ध होऊ शकलेला नाही. आपल्या पतीवर खोटे आरोप करून त्यांची सार्वजनिक प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे खरोखरच क्रूर आहे. जेव्हा दोन जोडीदारांपैकी एकाची अशी वृत्ती असते तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो. त्यामुळे जबरदस्तीने त्यांना एकत्र राहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे म्हणत कोर्टाने शेफ कुणालच्या बाजूने निर्णय दिला आहे.

शेफ कुणाल कपूर (44) हा एक सेलिब्रिटी शेफ आहेत. ते ‘मास्टर शेफ इंडिया’ या कार्यक्रमात जज म्हणून काम करतात. त्याला लहानपणापासूनच खाद्यपदार्थ बनवण्याची खूप आवड होती. त्यामुळे त्याने या क्षेत्रात आपले करिअर घडवले आणि देश-विदेशातील सर्वोत्तम शेफ बनला. कुणाल सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. इंस्टाग्रामवर त्याचे 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.