…तर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर नष्ट होईल, ‘इस्त्रो’च्या प्रमुखांनी व्यक्त केली भीती

बुधवारी 23 ऑगस्ट रोजी हिंदुस्थानने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-3’चे सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा हिंदुस्थान पहिला देश ठरला. हिंदुस्थानचे विक्रम लँडर चंद्रावर व्यवस्थित कार्य करत असून प्रज्ञान रोव्हरही यापासून वेगळे होऊन कामाला लागले आहे. मात्र या मोहिमेमध्ये आगामी काळात अनेक आव्हानंही आहेत. या आव्हानांबाबत इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माहिती दिली.

‘चांद्रयान-3’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सुस्थितीत असून चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पुढेही त्यांचे काम सुरु राहील. मात्र चंद्रावर वातावरण नाही. अशा स्थितीमध्ये कोणतीही वस्तू ‘चांद्रयान-3’वर येऊन आदळू शकते किंवा त्याची टक्कर होऊ शकते. याशिवाय थर्मल प्रॉब्लेम आणि कम्युनिकेशन ब्लॅकआउट अर्थात संपर्क तुटण्याचाही धोका आहे, असे एस. सोमनाथ ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाले.

चंद्रावर वातावरण नसल्याने एखादा लघुग्रह किंवा इतर कोणतीही वस्तू ‘चांद्रयान-3’वर खूप वेगाने आदळली तर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोन्ही नष्ट होतील. चंद्राचा पृष्ठभाग बारकाईने पाहिल्यास त्यावर उल्कापिंड पडल्याच्या अनेक खुणा दिसून येतील. पृथ्वीवरही दर तासाला लाखो उल्कापिंड पडतात, मात्र आपल्याला याबाबत कळत नाही. कारण पृथ्वीवर वातावरण असून उल्कापिंडांनी या वातावरणामध्ये प्रवेश करताच त्या जळून भस्म होतात, असेही एस. सोमनाथ म्हणाले.

माझी तुझ्यावर नजर आहे! ‘चांद्रयान-2’च्या ऑर्बिटरने काढले विक्रम लँडरचे फोटो, इस्त्रोने दिली माहिती

23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. आता प्रज्ञान रोव्हरही लँडरमधून बाहेर आले असून त्याने आपले काम सुरू केले आहे. ही फक्त इस्त्रोसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाप्रमाणे आम्हालाही लँडिंग यशस्वी झाल्याचा अभिमान आहे. आम्ही इतकी वर्ष केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. आगामी काळातही आम्ही आव्हानात्मक मिशन करण्यासाठी सज्ज आहोत, असेही एस. सोमनाथ म्हणाले.


दरम्यान, हिंदुस्थान लवकरच सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य एल-1’ अंतराळयान पाठवणार आहे. सौर मोहिमेव्यतिरिक्त इस्त्रो आगामी काळामध्ये ‘गगनयान’, ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ आणि ‘शुक्रयान-1’ या मोहिमांचीही तयारी करत आहे. ‘गगनयान’ ही मानवरहीत मोहीम असेल. तर ‘मार्स ऑर्बिटर मिशन’द्वारे मंगळाचा अभ्यास केला जाईल. ‘शुक्रयान-1’ द्वारे शुक्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. डिसेंबर 2024मध्ये या यानाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये लाँच होणार ‘आदित्य एल-1’