पश्चिम बंगालमध्ये रामनवमी उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी

देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमी उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट लागले. रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी शक्तीपूर भागामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळतेय.

शक्तीपूर भागामध्ये रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर धर्मांध लोकांनी घराच्या छतांवरून दगडफेक केली. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दगडफेकीच्या घटनेनंतर येथे हिंसाचार उफाळून आला. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सध्या येथे परिस्थिती नियंत्रणात असून दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांना मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.