भाजप आणि भारत राष्ट्र समितीची छुपी युती, काँग्रेसचा आरोप

तेलंगाणामध्ये भाजप आणि के चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती यांची छुपी युती असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए.रेवंथ रेड्डी यांनी केला आहे. हे दोन्ही पक्ष 2024 सालच्या लोकसभा निवडणुका एकत्र लढवण्याबाबत विचार करत असल्याचा आरोपही रेड्डी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच निझामाबाद इथे एक जाहीर सभा झाली होती. सरकारविरोधी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती असा आरोप रेड्डी यांनी केला आहे.

मोदी यांनी रेड्डी यांच्या विनंतीवरूनच निझामाबादमधील महबूबनगर इथे सभा घेतली होती. हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सरकारविरोधी मतांमध्ये फूट पडावी, काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून इथे ही सभा घेण्यात आली असे रेड्डी यांचे म्हणणे आहे. भारत राष्ट्र समिती आणि एमआयएम पक्ष हे मोदींचे दोन डोळे असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. राव आणि मोदी यांच्यातील बंधन हे फेव्हीकॉलचे बंधन असल्याचे म्हणतानाच रेड्डी यांनी मोदी सारखेसारखे तेलंगाणात का येतात हे जनतेला कळून चुकलं आहे असे म्हटले आहे. के.चंद्रशेखर राव यांच्याकडून भाजपला ‘प्रोटेक्शन मनी’ मिळत असल्याने राव यांची ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग चौकशी करत नाही असे रेड्डी यांचे म्हणणे आहे. राव आणि मोदी यांच्यात दिल्लीत दोस्ती आणि गल्लीत कुस्ती असा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी उपहासाने म्हटले.

रेड्डी यांनी यावेळी एमआयएमच्या ओवैसींवरही टीका केली. भाजप आणि बीआरएससारख्या पक्षांना ओवैसी साथ कशी काय देऊ शकतात असा सवाल रेड्डी यांनी विचारला आहे. त्यांनी बीआरएससोबत जायचं की काँग्रेससोबत यायचं याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे असे रेड्डी म्हणाले.

भाजप आणि राव यांचा बीआरएस पक्ष हे सातत्याने काँग्रेसवर टीका करत असतात. काँग्रेस या दोघांसाठी राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने ते ही टीका करत असल्याचे रेड्डी यांचे म्हणणे आहे. राव यांच्यासोबतची छुपी युती मोदींनीच जाहीर केली होती. निझामाबादमधील जाहीर सभेत त्यांनीच म्हटले होते ती राव यांना एनडीएमध्ये सामील व्हायचे होते. मोदी यांनी या सभेत बोलताना म्हटले होते की, “”केसीआर मला दिल्लीत भेटायला आले होते. ते मला म्हणत होते की तुमच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असून मला एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे. त्यांनी हैदराबाद महापालिकेतील संख्याबळासाठी माझ्याकडे पाठिंबा मागितला होता. मात्र मी त्यांना सांगितले की तुमच्या कृत्यांमुळे मी तुम्हाला साथ देऊ शकत नाही. ” रेड्डी यांनी केलेले सगळे आरोप के.चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समितीने फेटाळून लावले आहेत.