शरद पवार मोदींवर प्रयोग करत असावेत, हा प्रयोग यशस्वी होवो! काँग्रेस आमदाराचे विधान

मोदी गो बॅक’ ….पुणे नही मणिपूर जाओ, अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा विविध सामाजिक संघटना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेध केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यामध्ये येणार असून त्यांच्या या दौऱ्याला महाविकास आघाडीने मोठा विरोध केला आहे. महाविकास आघाडीकडून मंडई परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह काही नेत्यांना ताब्यात घेतले. मणिपूर जळत असताना सत्कार अन् पुरस्कार कसले स्वीकारताय असा सवाल यावेळी आंदोलकांनी पंतप्रधानांना केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान आपण विरोध करणार असल्याचे जाहीर केले होते, यामुळे दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती.

पुण्यात होत असलेल्या या कार्यक्रमाला कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की कदाचित टिळक कुटुंबीय चुकून विसरले असतील मात्र आपला त्या कुटुंबाबद्दल असलेला आदर कधीही कमी होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला निमंत्रक म्हणून शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. याबाबत विचारले असता धंगेकर यांनी म्हटले की, “लोकमान्य टिळक हे काँग्रेसच्या विचारांचे होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोठे योगदान होते. आज आपण मोदींचा सत्कार केला तर मोदींच्या डोक्यात लोकशाही घुसेल असं शरद पवार यांना वाटत असावे. पवार मोदींवर प्रयोग करत असावेत. हा प्रयोग यशस्वी होवो आणि मोदींनी लोकशाहीला मानावे.”