बस पुरवठा बंद करणारी ‘कॉसिस’ कंपनी ‘बेस्ट’कडून काळय़ा यादीत!

‘बेस्ट’मध्ये 700 इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस पुरवण्याचा करार मोडणाऱ्या ‘ई कॉसिस’ कंपनीला अखेर ‘बेस्ट’ प्रशासनाने काळय़ा यादीत टाकले आहे. शिवाय कंपनीकडून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘कॉसिस’ कंपनीने बस पुरवठय़ास नकार दिल्याने ‘बेस्ट’च्या पर्यावरणपूरक धोरणाला मोठा धक्का बसला असून मुंबईकर प्रवाशांचेही मोठे हाल होत आहेत.

‘बेस्ट’मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक एसी बस आणून मुंबईकरांना जास्तीत जास्त गारेगार प्रवास देण्याचे धोरण पालिकेकडून राबवण्यात आले आहे. यासाठी ‘ई कॉसिस’ आणि ‘स्विच मोबॅलिटी’ कंपनीसोबत करार करण्यात आला. यामध्ये ‘ई कॉसिस’ कंपनीसोबत बेस्टने तीन वर्षांपूर्वी करार केला होता. यामध्ये एकूण 700 बस संबंधित कंपनीकडून घेण्याचा करार बहुमताने करण्यात आला होता, मात्र यातील एकही बस संबंधित कंपनीने पुरवली नाही, तर काळय़ा यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर ‘स्विच मोबॅलिटी’ पंपनीने 50 बस पुरवल्या, तर 150 बस लवकरच पुरवण्यात येणार असल्याचे मान्य केले. मात्र ‘ई कॉसिस’ पंपनीने एकही बस पुरवली नसल्याचे दंड आणि काळय़ा यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.