60 किलो गांजासह चार तस्कर जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

मुंबईच्या पूर्व उपनगरातील नशेबाजांना विकण्यासाठी आणलेला गांजाचा साठा मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-7 च्या पथकाने जप्त केला. हा गांजा घेऊन आलेल्या चौघा तस्करांना पकडून तब्बल 60 किलो वजनाचा व 30 लाख 23 हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला.

काही तस्कर गांजाचा साठा घेऊन एका वाहनाने मुलुंड परिसरात येणार असल्याची खबर युनिट-7 ला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सावंत, उपनिरीक्षक काळे, शेलार, परबळकर, पवार, बल्लाळ, मोरे, पांडे, कांबळे, गलांडे, प्रमोद शिंदे, पाटील या पथकाने मुलुंड परिसरातील लोकसेवा शौचालयासमोर, बाळ राजेश्वर मार्ग, वैशाली नगर बस स्टॉपजवळ सापळा रचून तेथे आलेली गाडी अडवली. त्या गाडीची तपासणी केली असता त्यात दोन गोण्या भरलेला 60 किलो वजनाचा गांजा सापडला. या गांजाची तस्करी करणाऱया मोशिम गफूर शेख (35), मोहम्मद रहीम खान (42), रोहित विलास भालेराव (26), राकेश माधव गायकवाड (27) अशा चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या चारही आरोपींना गांजाच्या साठय़ासह पुढील कारवाईकरिता मुलुंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले असून नशेबाजांची गोची झाली आहे.