राज्यात नामर्दांचे सरकार; एक मुख्य तर, दोन डेप्युटी सुलतान, संजय राऊत यांचा कडाडून हल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण असून याच मुद्द्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारची पिसे काढली आहेत. राज्यात नामर्दांचे सरकार सुरू असून एक मुख्य, तर दोन डेप्युटी सुलतान कारभार हात असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दत्ता दळवी यांच्या प्रकरणात सतत त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. आज सकाळीत कोर्टाच्या प्रक्रियेबाबत त्यांचे सुनिल राऊत यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

दत्ता दळवी यांना झालेली अटक आणि त्यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध केला. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, दत्ता दळवी तुरुंगात असून त्यांच्या घरात कोणी नाहीय. शिवसैनिक कोर्टकचेरी आणि पोलीस स्थानकाच्या गडबडीत आहेत. यादरम्यान दोन-चार षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेले. ही त्यांची मर्दानगी. भाडेकरू गुंडांना पैसे देऊन हे हल्ले करण्यात आले. गुंडगिरीपासून ते सरकार चालवण्यापर्यंत भाड्याने माणसं घेतली जात आहेत. ते खरेच मर्द असते तर गाडी फोडून थांबले आहे. पळून जाणे याला नामर्दानगी म्हणतात. राज्यातच नामर्दांचे सरकार सुरू आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

मिंधे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अर्वाच्च भाषा वापरली होती. मिंधे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी तंगड्या तोडण्याची भाषा केली होती. त्यांच्या मुलाने एका बिल्डरचे अपहरण करून रिव्हॉल्वर काढले होते. काय कारवाई केली? या राज्यात दोन कायदे आहेत का? गद्दार आणि बेईमानांसाठी वेगळा कायदा आणि इतरांसाठी वेगळा कायदे हे जाहीर करा. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून तुमच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दोन कायदे आहेत का? असा सवाल आम्ही राज्यपालांना करू, असेही राऊत यांनी ठणकावले.

ते पुढे म्हणाले की, ज्या शब्दावरून हा गोंधळ झाला आणि दत्ता दळवी यांना अटक केली तो शब्द एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्यावर बनवलेल्या चित्रपटात त्यांच्याच तोंडी घालण्यात आलेला आहे. सेन्सॉरनेही तो कापला नाही. तुम्ही गुरू मानता त्यांचाच हा अपमान आहे. तुम्ही त्यांनी वापरलेला शब्द अजून एका त्यांच्याच शिवसैनिकाने वापरला असेल आणि तुम्ही त्यांना तुरुंगात टाकत असाल तर तुम्हाला आनंद दिघे काय कळले? असा सवाल राऊत यांनी केला.

जामीन प्रक्रियेला उशिर होत आहे. कारण पोलिसांवर दबाव आहे. जामिनासंदर्भात दाखल करायच्या उत्तरासही पोलिसांनी उशिर केला. त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसत होते की त्यांच्यावर दबाव आहे की तुम्ही जास्तीत जास्त वेळ लावा. पण काही हरकत नाही. तुरुंगात जाण्याने मी किंवा इतर शिवसैनिक तुटणार नाही. आम्ही डरपोक आणि नामर्द नाही, असेही राऊत यांनी सुनावले. ते पुढे म्हणाले की, तुकाराम महाजारांनी ‘ऐसा नरा, मारावे मोजुनी पैजारा’ हे आजच्या राज्यकर्त्यांना उद्देशून लिहिले आहे. चोर, लफंगे, गुंड, बदमाश, नोटंकी, ढोंगी यांनाच उद्देशून तुकाराम महाराजांनी हे लिहिले आहे. ही गुंडगिरीची भाषा आहे का? ही संतवचने आहेत. आपल्या राज्यकर्त्यांना मराठी कळते का? असा सवालही राऊत यांनी केला.

महाराष्ट्रातील स्थिती गंभीर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून शेतकरी हवालदील आहे. त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येत आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या भागात अवकाळी पावसाने पिकं, फळबागा उद्ध्वस्त केल्या आहेत. पण सरकार कुठे आहे? आस्मानी संकट कोसळत असताना राज्याचे मुख्य सुलतान आणि दोन डेप्युटी सुलतान हे प्रचारात व्यस्त असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. कालपर्यंत निवडणुकीमध्ये व्यस्त असणारे आम्ही सवाल केल्यावर जागे झाले आहेत. यांच्यावर इकडून खोके उचलून तिकडे सुपुर्त करण्याची जबाबदारी होती. सरकारच्या गलथान कारभारामुळे राज्यातील शेतकरी, कष्टकरी, श्रमीक संकटात सापडल्याचे राऊत म्हणाले.