मनुवादी विचाराच्या सरकारचा पराभव करा! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन

काँग्रेसची लढाई भाजप, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे, देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर बनायचे नाही. देशात सर्व धर्माचे लोक एकत्र राहावे, हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले आहे. काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, देशासाठी काँग्रेसचे लोक फासावर चढले. नरेंद्र मोदींच्या भाजपचे लोक स्वातंत्र्य चळवळीत कुठे होते? स्वातंत्र्यांच्या लढाईवेळी आरएसएसचे लोक कुठे लपून बसले होते, असे सवाल करून लोकसभा निवडणुकीत मनुवादी विचाराच्या सरकारचा पराभव करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे.

नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारसभेत मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. ते म्हणाले, ‘भाजप धर्माच्या नावावर मते मागत आहे. काँग्रेसला राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण दिले, पण ते आले नाहीत, असा खोटा प्रचार नरेंद्र मोदी करत आहेत.  नवीन संसदेच्या पायाभरणीला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बोलावले नाही. नवीन संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही, राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले नाही. ते मागासवर्गीय असल्याने भाजप व मोदींनी त्यांना न बोलावून दलित समाजाचा अपमान केला. हा अपमान आधी बंद करा.’

मोदींनी 23 भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घेतले

भाजपचे सरकार आले तर दरवर्षी 2 कोटी नोकऱया देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. 10 वर्षांतील 20 कोटी नोकऱया कुठे गेल्या हे आता गडकरी व मोदींना विचारा. परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देतो म्हणाले, पण हे पैसेही मिळाले नाहीत. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट केले नाही. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलतात, खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पद्धत आहे. भ्रष्टाचाऱयांना जवळ करू नका, असे म्हणणाऱया मोदींनीच 23 भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घेतले. विरोधी पक्षात होते तोपर्यंत भ्रष्टाचारी आणि भाजपमध्ये आले की, पवित्र झाले का, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला आहे.

संविधान टिकवण्याचे काम काँग्रेसने केले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान भाजपनेच कायम ठेवले असे नरेंद्र मोदी सांगत आहेत, ते साफ खोटे आहे. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी संविधान बनवण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवली व ते संविधान आजपर्यंत काँग्रेस पक्षाने टिकवून ठेवले आहे. आरएसएसच्या कार्यालयात बाबासाहेबांचा पह्टोही लावत नाहीत व कालपर्यंत देशाचा तिरंगा झेंडाही आरएसएसच्या कार्यालयावर फडकवला नाही.

नरेंद्र मोदींची गॅरंटी खोटी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात 5 न्याय व 25 गॅरंटी दिल्या आहेत. 30 लाख सरकारी नोकऱया, गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, सरकारी नोकऱयांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार, कामगारांचे अधिकार व हक्क कायम करणार, सामाजिक सुरक्षा देणार, शेतमालाला एमएसपीचा कायदा, पीकविम्याचे पैसे 30 दिवसांत देणार, जीएसटीमुक्त शेती करण्याची गॅरंटी काँग्रेसने दिलेली आहे. काँग्रेसची गॅरंटी वॉरंटीसहित आहे, मोदी गँरंटीसारखी खोटी नाही, असे खरगे म्हणाले.