मनोज जरांगे यांच्या परळीतल्या महासंवाद बैठकीला परवानगी नाकारली; आयोजकांना नोटीस

मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळावे सगेसोयरे यांचा समावेश व्हावा, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. त्यासाठी सकल मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचे आयोजन केले जात आहे. 20 मार्च रोजी परळी वैजनाथ येथे महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारत आयोजकांना कलम 149 सीआरपीसीप्रमाणे नोटीसही बजावली आहे. मात्र, आयोजकांनी ही बैठक होणार असल्याचे सांगितले आहे.

जिल्हाधिकारी बीड यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे व मेळाव्यांचा आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याच आदेशाचा दाखला देत पोलीस प्रशासनाने महासंवाद बैठकीला परवानगी नाकारली आहे. ही बैठक मोंढा मार्केट, हनुमान मंदिरासमोरील मैदानात होणार असून यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या परवानगीच्या आधारे आयोजकांनी परळी शहर पोलीस ठाण्यात 13 मार्च रोजी महासंवाद बैठकीसाठी अर्ज केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार आयोजकांनी जातीचा उल्लेख टाळत पुन्हा 17 मार्च रोजी परळी पोलीस प्रशासनाला नवीन अर्ज देत या बैठकीसाठी परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश व लोकसभेची आचारसंहिता याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या महासंवाद बैठकीला परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली आहे. आयोजक ही महासंवाद बैठक घेण्यासाठी ठाम असल्याचे दिसून येत आहे.