खोया खोया चांद – इस शहर में हर शख्स…

>> धनंजय कुलकर्णी

मुंबई महानगरी हा एक अजस्र अजगर आहे. तो आलेल्या प्रत्येकाला गिळंकृत करून टाकत असतो. पोटाची खळगी भरायला आलेला प्रत्येक जीव या मुंबईत सामावला जातो. या शहराने हिंदुस्थानातील प्रत्येक कष्टकरी गरीब जिवाला आपलंसं केलं. या महानगरीतील कष्टकरी समाजाचं जिणं सिनेमाच्या पडद्यावर अनेकदा मांडलं गेलं. 1978 साली मुजफ्फर अली यांनी ‘गमन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा संपूर्ण सिनेमा महानगरीतील आपल्या अस्तित्वाकरिता झगडणाऱया समाजाचा आहे. दिग्दर्शनातील हा मुजफ्फर अली यांचा हा पहिलाच प्रयोग होता आणि त्यात ते कमालीचे यशस्वी झाले होते. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. फारुख शेख, स्मिता पाटील, जलाल आगा, नाना पाटेकर आणि गीता सिद्धार्थ यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. संगीतकार जयदेव यांचे अप्रतिम संगीत, चित्रपटातील ठिबकणारे दु:ख प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ हातभार लावणारे होते. संपूर्ण चित्रपटाला एक दुःखाची, वेदनेची किनार आहे. यातील प्रत्येक पात्राचा एकच गुन्हा आहे, तो म्हणजे हे सर्वजण ‘मुफलीस’ आहेत ‘गरीब’ आहेत. भांडवलशाही व्यवस्थेत कष्टकरी समाजाची होणारी होरपळ फार प्रभावीपणे या चित्रपटात दाखवली आहे. दिग्दर्शक मुजफ्फर अली यांचा हा पहिला चित्रपट. 21 ऑक्टोबर 1944 रोजी अवधजवळच्या कोटवारा या प्रिन्सली स्टेटमध्ये एका राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून त्यांनी विज्ञानाची पदवी घेतली. काही काळ त्यांनी जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. काही शॉर्ट फिल्म्स बनवल्या. ते स्वत उत्तम चित्रकार होते. जाहिरात क्षेत्रात वावरल्यामुळे सामाजिक व्यंग त्यांना खूप चांगल्या पद्धतीने दिसायचे. यातूनच त्यांची पहिली कलाकृती ‘गमन’ तयार झाली. यानंतर तीनच वर्षांनी 1981 साली त्यांनी ‘उमराव जान’ हा एक क्लासिक चित्रपट दिग्दर्शित केला.

‘गमन’चे कथानक उत्तर प्रदेशात एका ग्रामीण भागात सुरू होते. गुलाम हसन (फारुक शेख) आणि त्याची बायको खैरून (स्मिता पाटील) आपल्या वृद्ध आईसोबत राहात असते. उत्तर प्रदेशांमध्ये जमीनदारीमध्ये त्यांची जमीन सावकाराने हडपलेली असते. गावात त्याला काहीच कामधंदा नसतो. शेतातून येणाऱया एक चौथाई उत्पन्नातून त्यांची भूकदेखील भागत नसते. दारिद्रय़ाचे चटके चोहोबाजूला बसत असतात. त्यामुळे फारुख शेख पोटापाण्यासाठी मुंबईला जातो. आपल्या आईचा आणि बायकोचा निरोप घेताना तो गलबलून जातो. परंतु भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ म्हणून तो महानगरीत येतो.

मुंबईत त्याचा मित्र लल्लू (जलाल आगा) टॅक्सीचालक असतो. लल्लूसोबत तोदेखील टॅक्सी चालवतो आणि महिन्याला पन्नास रुपये घरी मनीऑर्डर करत असतो. मुंबईत झोपडपट्टीत हे दोघेजण राहात असतात. यशोधरा (गीता सिद्धार्थ) एका मराठी कुटुंबातील मुलगी असते. तिचे लल्लूवर प्रेम असते. तिच्या घरीसुद्धा अठरा विश्व दारिद्रय़ असते. तिचा भाऊ वासू (नाना पाटेकर) हा बेकार असतो. आपल्या बहिणीला दुबईला पाठवून तिच्या पैशावर ऐश करण्याचा त्यांचा प्लॅन असतो. परंतु यशोधराचा याला विरोध असतो.
तिकडे गावी फारुक शेखची आई घरात पडते आणि तिचे कमरेचे हाड मोडते. मोठा खर्च निर्माण होतो. फारुक शेख मुंबईत सगळ्यांना पैसे मागतो, परंतु सगळीकडून त्याला नकारात्मक उत्तर मिळते. तिकडे यशोधरेवरचा भावाचा दबाव पराकोटीला पोहोचतो आणि सर्व प्रश्नाच्या मुळाशी ‘यशोधराचे लल्लूवर असलेले प्रेम’ तेच खतम करायचे म्हणून वासू लल्लूचा खून करतो! इकडे फारुक शेख हा सगळा प्रकार बघून प्रचंड हताश होतो. गरिबी, दारिद्रय़ासोबत लढायचे कसे? गावी पैसे पाठवायचे का? का सरळ आईला जाऊन भेटायचे? गावी जाऊन करायचे काय? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. या प्रश्नात तो पुरता गुरफटून जातो. रोज रेल्वे स्टेशनवर जाऊन आपल्या गावी जाणाऱया ट्रेनकडे पाहून आणखी हताश होतो. मुंबई मायानगरीतील हे भयावह वास्तव दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी फार चांगल्या रीतीने रुपेरी पडद्यावर मांडले आहे. लल्लूच्या मृत्यूनंतर गुलाम महानगरीमध्ये एकटा पडतो. रोज रेल्वे स्टेशनवर जाऊन हताशपणे आपल्या गावाकडे जाणाऱया रेल्वेला पाहात असतो. मुंबई नामक महानगरीच्या तुरुंगात आता तो कैद झालेला असतो. या शहरात आगमन प्रत्येकाचे होऊ शकते, पण पुन्हा गमन कधी होणार, हा प्रश्न आयुष्यभर छळत राहतो. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे शहरातील जीवन हे कष्टाचे, दुःखाचे तर गावाकडील जीवन म्हणजे सुखाचे अशी विभागणी आपल्याकडे साधारणपणे केली जाते. पण ‘गमन’मध्ये गाव आणि शहर या दोन्हीकडे यातना आहेत, दुःख आहे, वेदना आहेत. यातील गुलाम या प्रामाणिक युवकाचा प्रवास हा दुःखाकडून दुःखाकडे जाताना दाखवला आहे.

चित्रपटाला जयदेव यांचे संगीत आहे. यातील ‘सीने मे जलन आखों मे तुफान सा क्यूं है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूं है…’ सुरेश वाडकर यांनी गायलेले गाणे मुंबईच्या कष्टकरी समाजाचे भावजीवन उलगडून सांगणारे आहे. छाया गांगुली यांच्या स्वरातील ‘आपकी याद आती रही’ हे गाणेदेखील अतिशय सुंदर आहे. हरीहरनने एक गीत गायले आहे. यात ज्येष्ठ शास्त्राrय संगीत गायिका हिरादेवी यांनी गायलेली ठुमरी होती ‘रसके भरे तोरे नैन सांवरिया…’ यातील गाणी शहरीयार आणि मखदूम मोइनोद्दीन यांनी लिहिली होती. या चित्रपटाला त्या वर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मुजफ्फर अली (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), छाया गांगुली (सर्वोत्कृष्ट गायिका), संगीतकार जयदेव (सर्वोत्कृष्ट संगीतकार) असे हे तीन मानाचे राष्ट्रीय पुरस्कार होते. फारुक शेख याने यात रंगवलेला गुलाम फार सुंदर होता. स्मिताला त्यामानाने चित्रपटात छोटी भूमिका आहे.

भांडवलशाही दुनियेत कष्टकरी, गरीब, लाचार जगण्याची कुचंबणा फार प्रभावीपणे या चित्रपटातून दाखवली आहे! यूटय़ुबवर हा सिनेमा नि:शुल्क उपलब्ध आहे.

[email protected]

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)