‘नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका! शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

अभिनेते शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाच्या नावात ‘नथुराम गोडसे बोलतोय’ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर ‘नथुराम गोडसे’ या नव्या नावात यापुढे नवीन काही जोडू नका, असे निर्देश न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी शरद पोंक्षे यांना दिले. याप्रकरणी 30 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या नव्या नाटकातील संहिता, सादरीकरण व ट्रेडमार्कचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकाशी साधर्म्य असल्याने आमच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करीत माऊली प्रॉडक्शन्सचे मालक व निर्माते उदय धुरत यांनी माऊली भगवती प्रॉडक्शन्सचे मालक प्रमोद धुरत व अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरूद्ध दावा दाखल केला आहे. याप्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्यापुढे सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी नव्या नाटकाच्या नावात बदल करण्याची तयारी पोंक्षे यांनी दर्शवली होती. त्यासाठी सेन्सॉर मंडळाची परवानगी मिळवून ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल केल्याचे पोंक्षेंच्या वकिलांनी न्यायालयाला कळवले. या बदलाला आक्षेप नसल्याचे उदय धुरत यांच्यातर्फे ऍड. हिरेन कमोद व ऍड. महेश म्हाडगुत यांनी सांगितले.