माजी सैनिकाचा खून; दैनिकाच्या संपादकासह कॅमेरामनला अटक

मिळकतीच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या वादानंतर माजी सैनिकाचा छातीत क्रूड्रायव्हरने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी नगरमधील स्थानिक दैनिकाचा संपादक व त्याचा साथीदार कॅमेरामन या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने भोपाळ येथून अटक केली. या कारवाईमुळे जिह्यात खळबळ उडाली आहे.

संपादक मनोज वासुमल मोतीयानी (वय 33), स्वामी प्रकाश गोसावी (वय 28, दोघेही रा. सावेडीगाव, नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लोणी-तळेगाव रस्त्यावर रविवारी (दि. 30) एका 45 वर्षे वयाच्या व्यक्तीचा भोकसून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. तपास पथकाला घटनेच्या ठिकाणी एका चारचाकी वाहनाच्या टायरचे मार्क दिसून आले. त्या आधारे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. पेलिसांना सीसीटीव्हीमध्ये घटनास्थळी एक पांढऱ्या रंगाची मोटार येऊन लगेच गेल्याचे दिसले. दरम्यान, माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर (वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगाव, ता. नगर) हे बेपत्ता असल्याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. तपासात तो मृतदेह विठ्ठल भोर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. तपासात भोर आणि मनोज मोतीयानी यांच्यात प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या तपासात मनोज मोतीयानी आणि त्याचा साथीदार स्वामी गोसावी हे दोघे पांढऱ्या ह्युंदाई कारमधून गेल्याचे समजले. तसेच ते भोपाळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने सेंधवा, मध्य प्रदेश येथून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपी संपादक मनोज मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात विनयभंग, मुलीस पळवून नेणे, जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.