गामिनीला पाच नव्हे, सहा बछडे

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता गामिनीने पाच नव्हे, तर सहा बछडय़ांना जन्म दिला आहे. 10 मार्चला पाच बछडय़ांची संख्या सांगितली जात होती, परंतु आज पेंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नवजात बछडय़ांची संख्या सहा सांगितली. सहा बछडय़ांना एकाच वेळी जन्म देणाऱया गामिनीच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला गेला. चित्ता गामिनीला साऊथ आफ्रिकेहून आणले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत भूपेंद्र यादव यांनी लिहिले, मी खूप आनंदी आहे. ही पाच नाहीत, तर सहा बछडे आहेत. पहिल्यांदा आई बनणारी गामिनी सहा बछडय़ांना जन्म देणारी चित्ता मादी बनली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाच बछडय़ांना जन्म देण्याची नोंद अन्य चित्ता मादीवर होती.