जमीन विकून घेतलेल्या ‘थार’मध्ये केले ठार, नव्या कोऱ्या गाडीत गोळ्या घालून हत्या केली

उत्तर प्रदेशातील फिरोझाबादमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नव्या कोऱ्या गाडीमध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. तरुणाच्या कपाळावर मधोमध गोळी मारण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नगला सिंघी गावाजवळ पीपरियाजवळ या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. ज्या गाडीमध्ये हा मृतदेह सापडला आहे ती गाडी महिंद्रा कंपनीची थार गाडी असून या गाडीला अजून नंबर प्लेटही मिळालेली नव्हती. ठार मारण्यात आलेल्या तरुणाचे नाव धर्मवीर यादव असल्याचे कळाले आहे. तो 22 वर्षांचा होता. धर्मवीरच्या वडिलांचं एक वर्षापूर्वी रस्ते अपघातात निधन झालं होतं.

मृत तरुणाचे चुलत भाऊ जितेंद्र यादव यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी धरमवीर घरातून बाहेर पडला होता. रात्री 10 वाजता त्याच्याशी त्याच्या घरातल्यांच्याशी बोलणे झाले होते, त्याने सांगितले होते की, आपण घरीच आहोत आणि  मित्रांसोबत बाहेर जात आहे. धरमवीरने दोन महिन्यांपूर्वी तीन कोटी रुपयांची जमीन विकली होती, त्याचे वडील जमीनदार होते. वडिलांच्या निधनानंतर तोच घराची जबाबदारी सांभाळत होता. दोन बहिणींमध्ये तो एकुलता एक भाऊ होता. मोठी बहीण उमा हिचे लग्न झाले आहे. धाकटी बहीण शिकत आहे.

धर्मवीर आग्रा येथे पोलीस भरतीची तयारी करत होता आणि त्यासाठी त्याने कोचिंग क्लासही लावला होता. दहा दिवसांपूर्वी त्याने महिंद्रा थार कार खरेदी केली होती. गावकऱ्यांनी या खुनाबाबात माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक सर्वेश कुमार मिश्रा यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. धर्मवीरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.