केरळचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे निधन

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओमन चंडी यांच्या मुलाने फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. चंडी हे काही दिवसांपासून आजारी होते आणि बेंगळुरूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री राहिले होते.

ओमन चंडी यांचा राजकीय प्रवास

ओमन चंडी हे 2004-06 आणि 2011-16 असे दोनदा केरळचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने वयाच्या 27 व्या वर्षी 1970 च्या विधानसभा निवडणुका जिंकून आमदार म्हणून आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सलग 11 निवडणुका जिंकल्या. चंडी यांनी गेल्या पाच दशकांत केवळ पुथुप्पल्ली या त्यांच्या मूळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

2022 मध्ये, पुथुपल्लीचे सभागृहात 18,728 दिवस प्रतिनिधित्व करून ते राज्य विधानसभेचे सर्वात जास्त काळ काम करणारे सदस्य बनले. केरळ काँग्रेस (एम) चे माजी अध्यक्ष दिवंगत केएम मणी यांचा विक्रम त्यांनी मागे टाकला. चंडी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत चार वेळा वेगवेगळ्या मंत्रिमंडळात मंत्री आणि चार वेळा विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे.