जीव वाचवायचा असेल तर राज्य सोडा! मिझोराममध्ये मैतेई समाजाला धमक्या, मणिपूरच्या घटनेचा संताप

 

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेजारच्या मिझोराम राज्यामध्ये मैतेई समाजाला धमक्या मिळू लागल्या आहेत. मिझोरामच्या माजी बंडखोरांनी मैतेई समुदायाला राज्य सोडण्यास सांगितले आहे. याठिकाणी जाहीरपणे अशी धमकी दिली जात आहे. यानंतर मिझोरम सरकारने राजधानी ऐजॉलमधील मैतेई लोकांसाठी सुरक्षा वाढवली आहे.

शुक्रवारी आयझॉलमधून जारी केलेल्या निवेदनात, पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पीएएमआरए) ने मैतेई लोकांना त्यांचा जीव प्रिय असल्यास मिझोराम सोडण्यास सांगितले. कारण शेजारच्या राज्यात जातीवरून उसळलेल्या हिंसाचारात दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेनंतर मिझो तरुणांमध्ये संताप आहे. PAMRA ही मिझो नॅशनल फ्रंट (MNF) च्या माजी अतिरेक्यांची एक गैर-राजकीय संघटना आहे जी मिझो शांतता कराराच्या सर्व कलमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहे.

NDTV च्या वृत्तानुसार, PAMRA ने म्हटले आहे की, मणिपूरमधील कुकी-जो विरुद्ध झालेल्या हिंसाचाराने मिझोच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच मिझोराममध्ये मैतेई लोकांवर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ते स्वतः स्वीकारतील असा इशाराही या संघटनेने दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, “मिझोरममधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे आणि मणिपूरमधील मैतेई लोकांसाठी मिझोरममध्ये राहणे सुरक्षित राहिलेले नाही, मणिपूरमधील बदमाशांनी केलेल्या रानटी आणि घृणास्पद कृत्यांमुळे. PAMRA मिझोराममधील सर्व मैतेई लोकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्याचे आवाहन करते.”

मिझोराम सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, मैतेई व्यक्तीला इजा होणार नाही याची खात्री करण्यासाठी आधीच पावले उचलली गेली आहेत. या घडामोडीनंतर मणिपूर सरकारने मिझोराम आणि केंद्र सरकारशी चर्चा केली.

4 मे रोजी शूट केलेला एक व्हिडिओ बुधवारी समोर आला, ज्यामध्ये मणिपूरमधील दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली आणि दुसऱ्या बाजूच्या जमावाने त्यांचा विनयभंग केला. यातील मुख्य आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे.