भयावह! मणिपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकाच्या वृद्ध पत्नीला जिवंत जाळले, एपीजे अब्दुल कलाम यांनी केले होते सन्मानित

मणिपूरचा हिंसाचार दिवसेंदिवस चिघळत असून अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. या हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक घरे उद्ध्वस्त झाली. मणिपूरमध्ये लाखो लोकं दहशतवाद्यांच्या कारवायांना बळी पडले. उन्मत्त झालेल्या जमावाने ना महिलांना सोडलं ना मोठ्यांचा आदर केला. तेथील निरंकुश शासनामुळे मणिपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकाची वृद्ध पत्नीही सुरक्षित राहू शकली नाही. ज्या महिलेचे पती देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढले, त्याच 80 वर्षीय महिलेला जमावाने जिवंत जाळल्याची भयावह घटना घडली आहे.

स्वातंत्र्यसैनिक चुरचंद सिंग यांचे कुटुंब मणिपूरच्या ककचिंग जिल्ह्यातील सेरो गावात राहते. स्वातंत्र्यसैनिक दिवंगत चुरचंद सिंग यांना तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची वृद्ध पत्नी घरात कुटुंबासोबत राहत होती. राजधानी इंफाळपासून सेरू गाव सुमारे 45 किमी अंतरावर आहे. 3 मेपासून मणिपूर जळू लागले तेव्हा हिंसाचाराची आग सेरू गावात पोहोचली. 28 मे रोजी लोकांचा जमाव गावात पोहोचला. गोळीबार सुरु झाल्यामुळे लोक घरातून पळू लागले. मात्र स्वातंत्र्यसैनिकाची वृद्ध पत्नी इबेटोंबी या घरातच अडकून राहिल्या. त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास भाग पाडले. त्यांनी घरातील सदस्यांना सांगितले की आधी स्वतःचे संरक्षण करा.

सगळीकडे जाळपोळ सुरू होती, गोळीबार सुरु होता, असे नातेवाईकांनी सांगितले. इबेटोंबी यांचा 22 वर्षांचा नातू प्रेमकांत याने सांगितले की, त्यांनी एका आमदाराच्या घरी आश्रय घेतला होता. हिंसा करणाऱ्यांना घरात राहणाऱ्या वडिलधाऱ्यांची दया येईल, असं सगळ्यांना वाटत होतं, पण ते चुकीचं ठरलं. जमावाने आजीला घरात कोंडून बाहेरून घर बंद केले, त्यानंतर चारही बाजूंनी घर पेटवून दिले. आमच्या आजीला वाचवायला कोणीही आले नाही. आजी जळून राख झाली. प्रेमकांत यांनी सांगितले की, ते आजीला वाचवण्यासाठी जात असताना त्यांच्या हाताला आणि मांडीला गोळी चाटून गेली.

प्रेमकांत दोन महिन्यांनंतर गावात परतला आहे. त्याचे घर जिथे उभे होते तिथे आता फक्त राख, जळालेली लाकडं आणि लोखंडी सांगाडा दिसत होता. आजीची जळालेली हाडे जळालेल्या घरामध्ये विखुरलेली आहेत. प्रेमकांतने सांगितले की जिथे त्याच्या आजीचा पलंग तिथे होता तिथे आता फक्त एक छायाचित्र आहे. ज्यात तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम स्वातंत्र्यसैनिक चुरचंद सिंग यांचा सत्कार करत आहेत.