अकरावीच्या दोन लाख विद्यार्थ्यांना कॉलेज सुरू होण्याची प्रतीक्षा

अकरावीत प्रवेश घेतलेले 2 लाख 13 हजार 178 विद्यार्थी कॉलेज सुरू होण्याची वाट पाहत आहेत. ऑनलाइन प्रवेशाच्या तीन नियमित गुणवत्ता यादीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून विशेष फेरी 1 ची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्याप शिक्षण संचालकांकडून अकरावीचे वर्ग घेण्याविषयी सूचनाच निघालेल्या नाहीत. दरवर्षी कॉलेजस्तरावर 75 टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग घेण्याची परवानगी प्राचार्यांना देण्यात येते. यंदा मात्र तशा कोणत्याही सूचना प्राचार्यांना मिळालेल्या नाहीत.

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात अकरावीचे वर्ग सुरू झाल्यास गणपतीच्या सुट्टी आधी निदान दीड महिना कॉलेज सुरू राहतील. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात अकरावीचे वर्ग सुरू करा, अशी मागणी केली जात आहे. सोमवारी, 24 जुलै रोजी विशेष फेरी 1 जाहीर झाली. या फेरीत एकूण 93,202 विद्यार्थ्यांपैकी 80,039 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे सुमारे 13 हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहे. प्रवेश मिळालेल्या 80,039 विद्यार्थ्यांपैकी 61,012 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.अद्याप 19 हजार 27 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. विशेष फेरी 1 च्या प्रवेशानंतर विशेष फेरी 2 चे वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळेपर्यंत अकरावीचे वर्ग सुरू होण्यासाठी वाट पाहायची का, असा प्रश्न विद्यार्थी आणि प्राचार्यांसमोर आहे.

आतापर्यंत झालेले प्रवेश

  • कॅप फेरी – 1,68,353
  • इनहाऊस – 8655
  • अल्पसंख्याक – 30,499
  • मॅनेजमेंट – 5671
  • एकूण – 2,13,178

विशेष फेरीतील प्रवेशाला 31 जुलैपर्यंत मुदत

मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीमुळे विशेष फेरीतील प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष फेरी 1 नुसार प्रवेश घेण्यासाठी आज 27 जुलैपर्यंत शेवटची मुदत होती. मात्र पावसामुळे शाळा, कॉलेजना सुट्टी दिल्याने अकरावी प्रवेश घेण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अकरावीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण संचालकांकडून अद्याप सूचना मिळालेल्या नाहीत. अकरावीची प्रवेशप्रक्रियाही अद्याप सुरू आहे. प्रवेश पूर्ण होण्यापूर्वीच वर्ग सुरू केल्यास विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडण्याची शक्यता आहे. शिक्षण संचालकांच्या वर्ग घेण्याच्या सूचना आल्यानंतर लगेचच कार्यवाही केली जाईल. प्राचार्यांनीदेखील शिक्षण संचालकांच्या सूचनेआधीच वर्ग घेण्याची घाई करू नये.

संदीप संगवे, शिक्षण उपसंचालक, मुंबई